मंत्रालयातील लिपिकांचे कामबंद आंदोलन, सरकारने उगारला कारवाईचा बडगा
वेतनश्रेणीमध्ये बदल करण्याबरोबरच लिपिक-टंकलेखक संवर्गाचे पदनाम बदलून मंत्रालय सहाय्यक करण्याच्या मागणीसाठी मंत्रालयातील लिपिकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. आज या कर्मचाऱयांनी दुपारी मंत्रालयाच्या आरसा गेटसमोर आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला तर संपात सहभागी होणाऱयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला.
वेतनश्रेणीमध्ये बदल करण्याची मागणी मंत्रालयातील लिपिक-टंकलेखकांनी लावून धरली आहे. त्याचबरोबर चौथ्या वेतन आयोगापासूनची वेतन विसंगती दूर करावी आणि सातव्या वेतन आयोगातील बक्षी समितीच्या शिफारशी लागू कराव्यात या मागणीसाठी आंदोलन सुरू झाले आहे. मंत्रालयात लिपिकांची 40 टक्के पदे रिक्त आहेत याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे.
महासंघाचा पाठिंबा
‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’ने पाठिंबा दिला आहे. मंत्रालयीन लिपिक संवर्गातील कर्मचारी आपल्या न्याय्य हक्कांसाठी संपावर गेले आहेत. शासनाने याप्रकरणी सकारात्मक भूमिका घेऊन कर्मचाऱयांशी तातडीने चर्चा करावी आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महासंघाने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
Comments are closed.