रेल्वे प्रशासनाची मराठी विरोधी भूमिका; टीसीकडे मराठीत बोलण्याची मागणी करणाऱ्या प्रवाशाला तासभर डांबले
मुंबईत मराठी माणसाची गळचेपी होत असल्याचे वृत्त येत असते. तसेच सरकारने टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी तीन महिन्यांचा वेळही दिला आहे. मात्र, आता रेल्वे प्रशासनाकडूनच मराठीला विरोध होत असल्याची संतापजनक घटना पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानकात घडली आहे. त्यामुळे या घटनेविरोधात मराठी माणसांकडून संताप व्यक्त होत आहे.
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एक संतापजनक घटना घडली आहे. एका प्रवाशाने टीसीकडे मराठीत बोलण्याची मागणी केली. यावरून झालेल्या वादानंतर रेल्वेच्या टीसींनी संबंधित प्रवाशाला अंधेरी स्थानकातील कार्यालयात जवळपास एक तास बंदिस्त करून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. मराठीत बोलण्याची मागणी करणाऱ्या प्रवाशाला तासभर डांबल्याने संताप व्यक्त होत आहे.
त्या प्रवाशाविरोधात ‘सरकारी कामात अडथळा’ आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अमराठी टीसींना पाठीशी घालण्यासाठी रेल्वेने एका मराठी टीसीला पुढे केल्याचाही आरोप होत आहे. या घटनेचे वृत्त पसरताच अंधेरी पूर्व येथील आरपीएफ कार्यालयाबाहेर ‘मराठी एकीकरण समितीचे’ कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी प्रवाशाच्या सुटकेसाठी कार्यालयात धडक दिली.
एक प्रवासी लोकलमधून प्रवास करताना त्याने तिकीट तपासणीसाठी आलेल्या टीसीकडे मराठीत संवाद साधण्याची मागणी केली. महाराष्ट्रात काम करत असाल तर मराठीत संवाद साधा असे तो म्हणाला. टीसीकडे मराठीचा आग्रह करत असाल तर तुम्ही व्हॉट्स अॅप मराठीत का वापरत नाही? ते तुम्ही हिंदी आणि इंग्रजीमध्ये का वापरता? तुम्हाला मराठी बाराखडी येते का? असा अजब आणि उलट सवाल टीसीने केला. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करत प्रवाशाला कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात काम करत असाल तर मराठी येणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण आग्रह धरला. मात्र समोरचा टीसी ऐकत नव्हता. त्याने तुम्ही हिंदी आणि इंग्रजीमध्ये का बोलता, मोबाईलमध्ये ती भाषा का वापरता? असे उलट सवाल केले, असे प्रवाशाचे म्हणणे आहे. एखाद्या प्रवाशाने समोरच्या कर्मचाऱ्याला मराठीत बोलण्याचा आग्रह केल्यानंतर तो सरकारी कामात हस्तक्षेप कसा काय ठरतो असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मराठीत बोलण्याचा आग्रह केल्यामुळे संबंधित प्रवाशाला कार्यालयात नेण्यात आलं आणि त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्नही झाल्याचं दिसून आलं. सोशल मीडियावरही या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अशा उद्धट वर्तणुकीवर मराठी माणसांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Comments are closed.