अकोल्यातील ‘त्या’ तरूणासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सरसावली, वधूसंशोधन करत लग्नाचा सर्व खर्चही


शरद पवारांना विवाह पत्र: अकोल्यातील एका 34 वर्षीय तरुणाच्या “मला लग्नासाठी पत्नी मिळवून द्या” या भावनिक साकड्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP Sharad Pawar Faction) प्रतिसाद दिला आहे. या तरुणासाठी आता शरद पवारांचा पक्ष स्वतः वधू संशोधन करणार असून, त्याच्या लग्नाचा संपूर्ण खर्च देखील पक्ष उचलणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे (Sangram Gawande) यांनी दिली आहे.

8 नोव्हेंबर रोजी अकोला दौर्‍यावर असताना शरद पवारांना या तरुणाने एक भावनिक पत्र दिले होते. त्यात त्याने लिहिले होते की, “माझे वय वाढत चालले आहे. भविष्यात माझे लग्न होणार नाही, अशी भीती वाटते. मी एकाकीपणामुळे त्रस्त झालो आहे. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायला तयार आहे. तिथे काम करून संसार नीट चालवीन, याची मी हमी देतो. कृपया माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. तुम्ही मला जीवनदान द्याल. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही,” असे तरुणाने म्हटले होते.

NCP Sharad Pawar Faction: शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रतिसाद

या पत्रात त्याने स्वतःचा मोबाईल नंबर आणि पत्ता दिल्याने शरद पवार व व्यासपीठावरील नेते काही क्षण अवाक झाले होते. या पत्राची चर्चा अकोल्यातच नव्हे, तर सोशल मीडियावरही जोरदार झाली. अखेर पक्षाच्या वरिष्ठांकडून जिल्हा पदाधिकाऱ्यांना या तरुणाला मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले की, “आम्हाला या तरुणाला मदत करण्यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठांकडून आदेश मिळाले आहेत. लवकरच आम्ही त्याच्यासाठी योग्य वधू संशोधन सुरू करणार आहोत. त्याचे आयुष्य सेटल करण्याची जबाबदारी आमचा पक्ष घेणार आहे, असे त्यांनी म्हटले.

Akola News: “सिंगल” तरुणांचा गंभीर प्रश्न

दरम्यान, अविवाहित तरुणांवर सोशल मीडियावर अनेकदा विनोदी मिम्स आणि पोस्ट्स येतात. पण अकोल्यातील या तरुणाच्या पत्रामुळे अविवाहितपणाचा सामाजिक आणि मानसिक ताण किती गंभीर असू शकतो, याची जाणीव समाजाला झाली आहे. या तरुणाच्या विनंतीने केवळ पवारांनाच नव्हे, तर संपूर्ण समाजालाच विचार करायला भाग पाडले आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून घेतलेला हा निर्णय सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Amol Mitkari & Ajit Pawar: अजितदादांनी एका हाताने काढून घेतलं, पण दुसऱ्या हाताने भरभरुन दिलं, अमोल मिटकरींवर नवी जबाबदारी

आणखी वाचा

Comments are closed.