ओमानच्या आखातात टँकरजवळ भीषण स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली, पण इंधन गळती सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ओमानच्या आखातात एका व्यापारी टँकरला बाह्य स्फोटाचा जोरदार फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युनायटेड किंगडम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सने (UKMTO) या घटनेची माहिती दिली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट ओमानची राजधानी मस्कतच्या पूर्वेला सुमारे 60 सागरी मैल अंतरावर झाला. जहाजाच्या कॅप्टनने (मास्टर) दिलेल्या माहितीनुसार, टँकरच्या डाव्या बाजूला, पाण्याच्या पातळीजवळ आणि जहाजाच्या मागील भागाच्या दिशेने हा बाह्य स्फोट झाला. स्फोटानंतर जहाजावरील सर्व खलाशी आणि स्वतः जहाज सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

पण या स्फोटामुळे जहाजाचे किरकोळ नुकसान झाले असून त्यातून काही प्रमाणात इंधन समुद्राच्या पाण्यात गळत असल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील या घटनेमुळे व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.

Comments are closed.