उत्तरेकडील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.

हिमाचल प्रदेश ते उत्तराखंडपर्यंतच्या रस्त्यांवर वाहनांचा वेग मंदावला

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उत्तर भारतातील तीव्र उष्णतेमुळे लोकांना पर्वतांकडे जाण्यास भाग पडले आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी लोक हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील थंड पर्यटनस्थळांकडे वळत आहेत. तथापि, दिलासा शोधणाऱ्या हजारो पर्यटकांना आता एका नवीन समस्येचा सामना करावा लागत आहे. मनाली, रोहतांग, नैनिताल आणि चारधाम या तीर्थयात्रा मार्गांवर प्रचंड गर्दी झाल्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी लोकांना तासन्तास आपल्या वाहनांमध्ये अडकून राहावे लागत आहे.

गेल्या दोन दिवसात उत्तर भारतातील पर्वतीय प्रदेशातील हवामान सतत बदलत आहे. अनेक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे, तर काही भागांमध्ये अजूनही हिमवर्षाव होत आहे. असे असूनही यात्रेकरू आणि पर्यटकांचा उत्साह जराही कमी झालेला नाही. लांबचा प्रवास आणि वाहतूक कोंडी असूनही लोक पर्वतांकडे धाव घेत आहेत. हिमाचल प्रदेशातील मनाली आणि रोहतांग पासमध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. मे महिना संपत आला असला तरी, रोहतांग पास बर्फाने झाकलेला आहे आणि ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत आहेत. या गर्दीचा परिणाम रस्त्यांवर स्पष्टपणे दिसत आहे. उत्तराखंडमधील नैनितालमध्येही पर्यटकांचा मोठा ओघ दिसून येत आहे. वीकेंडला मोठ्या संख्येने लोक शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांना भेट देत आहेत. बाबा नीम करोली महाराजांच्या प्रसिद्ध कैंची धाममध्येही मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. देशातील विविध राज्यांमधून तसेच परदेशातूनही लोक दर्शनासाठी येत आहेत. चारधाम यात्रेमुळे उत्तराखंडच्या चमोली जिह्यात वाहनांचा ताण सातत्याने वाढत आहे.

 

 

Comments are closed.