अमेरिकेत परतलेला मॅथ्यू व्हॅनडाइक कोर्टात हजर झाला

म्यानमार ड्रोन युद्ध प्रशिक्षण प्रकरण : एनआयए न्यायालयासमोर हजर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

म्यानमारमध्ये बंडखोर समुहांना ड्रोन युद्धाचे प्रशिक्षण देण्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात अमेरिकेचा नागरिक मॅथ्यू एरॉन वॅनडाइक शुक्रवारी दिल्लीतील राउज अॅव्हेन्यू न्यायालयासमोर उपस्थित राहिला. अमेरिकेतून परतल्यावर तो एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर हजर राहिला. सप्टेंबर महिन्यात त्याला परिवाराची भेट घेण्यासाठी एक महिना अमेरिकेला जाण्याची अनुमती मिळाली होती. न्यायालयाने विदेशात जाण्याची अनुमती देत भारतात परतून हजर राहण्याचा निर्देश दिला होता. तसेच वापसीच्या 72 तासांच्या आत न्यायालयाला कळविणे अनिवार्य केले होते.

वॅनडाइकला याप्रकरणी 18 सप्टेंबर रोजी ‘डिफॉल्ट जामीन’ मिळाला आहे, परंतु एनआयएचा तपास अद्याप जारी आहे. एनआयएकडून 8 सप्टेंबर रोजी दाखल आरोपपत्र अपूर्ण आढळून आल्याने विशेष एनआयए न्यायालयाने वॅनडाइकला डिफॉल्ट जामीन दिला होता. तर वॅनडाइकला 13 मार्च रोजी अटक करण्यात आली होती आणि तो 180 दिवसांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत कोठडीत राहिला होता.

जामीन मंजूर करताना न्यायालयाने इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट, 2025 चे कलम 21 आणि 23 लागू केले, तर आरोपींच्या अटकेवेळी लावण्यात आलेल्या युएपीएच्या कलमांना हटविले होते. जामिनानंतर वॅनडाइकने कथित इमिग्रेशन उल्लंघनाप्रकरणी विदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयात 5.5 लाख रुपयांचा दंड भरला होता.

पर्यटक व्हिसावर भारतात

एनआयएने 13 मार्च रोजी वॅनडाइकसोबत 6 युक्रेनियन नागरिकांना अटक केली होती. यात मॅक्सिम गोंचारुक, पेट्रो हुबरा, इवान सुकमनोवस्की, मारियन स्टेफनकिव, तारासा स्लीवियाक आणि विक्टर कामिन्स्की यांचा समावेश आहे. तपास यंत्रणेनुसार हे लोक पर्यटक व्हिसावर भारतात आले होते, त्यानंतर त्यांनी आवश्यक परवान्याशिवायच मिझोरममध्ये प्रवेश केला आणि तेथून म्यानमारमध्ये पोहोचले होते. तेथे त्यांनी बंडखोर समुहांना ड्रोनचे प्रशिक्षण दिले होते. आरोपींनी युरोपमधून अत्याधुनिक ड्रोन उपकरणे म्यानमारमध्ये पोहोचविण्यास मदत केली होती.

Comments are closed.