सर्वेक्षणावेळी गायब होणाऱ्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांविरोधात म्हाडा अॅक्शन मोडवर
संक्रमण शिबिरातील घुसखोरीला चाप लावण्यासाठी म्हाडातर्फे सुरू असलेले रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे. म्हाडाच्या आवाहनानंतरही काही रहिवासी सर्वेक्षणाला प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणाची टीम दाखल होताच घराला कुलूप लावून गायब होणाऱया रहिवाशांचा आकडा अडीच हजारांच्या घरात असल्याने म्हाडा अशा रहिवाशांविरुद्ध कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत मुंबई शहर व उपनगरात एकूण 34 ठिकाणी संक्रमण शिबिरे असून यात 20 हजार रहिवासी राहतात. शासन निर्णयानुसार संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे ‘अ’, ‘ब’ व ‘क’प्रमाणे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने म्हाडामार्फत रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत 16 हजारांहून अधिक रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षणाला प्रतिसाद न देणाऱया रहिवाशांना घुसखोर ठरवणार असा इशारा म्हाडाने दिला तरी अजूनही काही रहिवासी सर्वेक्षणाला प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
सर्वेक्षणाला प्रतिसाद न देणाऱया रहिवाशांना आतापर्यंत दोन वेळा आवाहन करण्यात आले आहे. तरीही काही रहिवासी सर्वेक्षणा वेळी घराला कुलूप लावून गायब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा रहिवाशांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येणार असून लवकरच याबाबतचा निर्णय घेऊ, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
Comments are closed.