दोन वेळा मुदतवाढ देऊनही… म्हाडाच्या 2640 घरांसाठी 62 हजार अर्ज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दोन वेळा मुदतवाढ देऊनही म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आतापर्यंत 88 हजार 763 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 62 हजार 420 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. इच्छुक अर्जदार 28 मे रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकतील तर 29 मे रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करू शकतील.

म्हाडाने मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2640 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 30 मार्चपासून सुरुवात झाली. घरांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे सुरुवातीपासून लॉटरीला अर्जदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अर्जदारांची संख्या वाढावी यासाठी म्हाडाने दोन वेळा मुदतवाढ दिली तसेच विक्रोळी प्रकल्पातील 1221 घरांच्या किंमती 7.5 टक्क्यांनी कमी केल्या तरीही अर्जसंख्येत म्हणावी तशी वाढ झाली नाही.

 म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी अर्जदारांचे लाखोंच्या संख्येने अर्ज येतात. मुंबई मंडळातर्फे मे 2023 मध्ये 4083 घरांसाठी काढलेल्या सोडतीसाठी 1 लाख 19 हजार 278 अर्जदारांनी तर सप्टेंबर 2024 मध्ये काढलेल्या 2030 घरांच्या सोडतीसाठी 1 लाख 13 हजार 811 अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज केले होते. यंदा घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या बजेट बाहेर असल्यामुळे लाखांचा टप्पा म्हाडाला गाठता आला नाही.

Comments are closed.