अजितदादा असते तर, भाजपने अशी हिम्मत केली नसती; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बहल यांचा भाजपवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीचे अधिक संख्याबळ असताना भाजपकडून थेट या जागेवर दावा केला जात असतानाच आज उपमुख्यमंत्री अजितदादा हयात असते, तर भाजपने पुणे विधान परिषदेवर हक्क दाखवण्याची हिंमत केली नसती, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला. त्यामुळे पुण्याच्या जागेवरून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे बोलले जावू लागले आहे.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षात भाजपची ताकदही वाढली आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे असे ८१० मतदार आहेत. राष्ट्रवादीचे ३४४ मतदार आहेत. त्याखालोखाल भाजपचे ३०५ सदस्य आहेत. असे असताना भाजपकडून पवार कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे मनुसबे आखले जात आहेत. पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने योगेश बहल यांनी या राजकीय वास्तवाकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवल्याचे बोलले जात आहे.

शहराध्यक्ष बहल म्हणाले, अजितदादांच्या तुलनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नवख्या आहेत. भाजपकडून त्यांचा फायदा घेऊन, दबावतंत्राचे राजकारण खेळले जात आहे. कदाचित भाजपाचा असा प्रयत्न असू शकतो, हे नाकारता येणार नाही. मात्र, असे असले तरी सुनेत्रा पवार खंबीर आहेत. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक व सदस्य संख्या सर्वांधिक आहे. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत. त्या पुणे विधान परिषदेची आमच्या हक्काची जागा राष्ट्रवादीलाच मिळवतील, असा विश्वास बहल यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बहल यांच्या विधानावरून महायुतीमधील खटके उडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.