मायक्रोसॉफ्ट बोंबललं, जगभरात हाहाकार! ई-मेल ठप्प, मीटिंग बंद!!

आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर जगभरातील अनेक कंपन्या, बँका, विमान कंपन्या सरकारी संस्था तसेच कार्यालयांमधील कामकाज अक्षरशः ठप्प पडले. ई-मेल बंद झाले, मीटिंग सेवा बंद पडली. त्यामुळे जगभरात हाहाकार उडाला. अनेक विमानतळांवरील यंत्रणा बंद पडल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. बँकांचेही व्यवहार प्रभावित झाले. याचा मोठा फटका उद्योग जगताला बसला आहे. सुमारे 18 तासांनी हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मायक्रोसॉफ्टच्या काही सेवा सुरू झाल्या. मात्र सर्व सेवा पूर्वपदावर येण्यास आणखी काही तास लागू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे.

गुरुवारी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास मायक्रोसॉफ्टच्या सेवा बंद झाल्या. ई-मेलसाठी वापरण्यात येणारे मायक्रोसॉफ्ट आऊटलुक, मीटिंगसाठी वापरले जाणारे मायक्रोसॉफ्ट टीम्स, शेअरिंग प्लॅटफॉर्म शेअर पॉइंट, एआय टुल को-पायलट, सायबर सुरक्षा सेवा मायक्रोसॉफ्ट डिफेंडर, प्लानर आणि एक्स्चेंज ऑनलाईन या सेवा बंद पडल्या. यापूर्वी 2024 मध्ये मायक्रोसॉफ्टच्या क्राऊडस्ट्राईकमध्ये चुकीच्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे जगभरात हाहाकार उडाला होता, मात्र त्यावेळी संगणक सुरूच होत नव्हते. यंदा समस्या मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊट सॉफ्टवेअरमध्ये असल्याचे सांगण्यात आले. हा कोणताही सायबर हल्ला नसल्याचेही मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे. जगभरात सुमारे 45 कोटी लोक मायक्रोसॉफ्टच्या विविध सॉफ्टवेअरचा वापर करतात.

कुठे काय पडले बंद…

हाँगकाँगमध्ये बँकिंग सेवा, ऑस्ट्रेलियात गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांच्या कामांमध्ये अडचणी आल्या. जपानमध्ये सरकारी यंत्रणेला फटका बसला. फिलिपाईन्समध्ये न्यायालयांचे कामकाज प्रभावित झाले. हजारो प्रवासी विमानतळांवर ताटकळत बसले होते. अनेक डॉक्टर रुग्णांना ऑनलाईन सल्ला देऊ शकले नाहीत.

कशामुळे ठप्प पडल्या सेवा?

जगभरातील आऊटेजसंदर्भात मायक्रोसॉफ्टने सांगितले की, सॉफ्टवेअरमध्ये चुकीच्या पद्धतीने अपडेट करण्यात आल्यामुळे विविध सेवांवर परिणाम झाला आहे. काही सर्व्हर अचानक बंद पडले. त्यामुळे इतर सर्व्हरवर प्रचंड ताण आला आणि टप्प्याटप्प्याने अनेक सेवा ठप्प पडल्या. सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी पुन्हा सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम सुरू आहे, मात्र ते सध्या अपेक्षेनुसार परिणामकारक ठरलेले नाहीत. सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही तास लागू शकतात, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

दीड लाख तक्रारी

वेबसाईट आऊटेजवर लक्ष ठेवणाऱया ‘डाऊनडिटेक्टर’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार केवळ आऊटलुक सेवेशी संबंधित सुमारे 1.40 लाख लोकांनी तक्रारी केल्या होत्या. याशिवाय इतर सेवांसंदर्भातदेखील लाखो लोकांनी तक्रारी केल्या आहेत.

विमान सेवेला फटका; उड्डाणे रद्द

मायक्रोसॉफ्टच्या सेवा बंद पडल्यामुळे विमान कंपन्याच्या सेवांवर परिणाम झाला. हिंदुस्थानात इंडिगो, स्पाईस जेट, एअर इंडियासह जगभरातील अनेक विमान कंपन्यांना आऊटेजचा फटका बसला. जगभरातील अनेक विमानतळांवरील उड्डाणे रद्द करण्यात आली, तर काही उड्डाणांना विलंब झाला.

Comments are closed.