मायक्रोसॉफ्ट 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देणार, मोठ्या नोकरकपातीची घोषणा
मुंबई : जगातील प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टने कंपनीत काम करणाऱ्या तीन टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय (Microsoft Lay Off) घेतला आहे. त्यामुळे या कंपनीतील 6,000 लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. कंपनीच्या आर्थिक हितासाठी कंपनीकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात येत असल्याचं मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये सध्या 2.25 लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आताची संख्या ही सर्वात मोठी आहे. 2023 साली कंपनीच्या 10 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं होतं.
Microsoft Layoff 2025 : AI वापरावर कंपनीचा भर
मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये अनावश्यक कर्मचाऱ्यांना कमी करून त्या ठिकाणी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मायक्रोसॉफ्टमधील ही कपात ही तंत्रज्ञान उद्योगात सुरू असलेल्या बदलाचा एक भाग आहे. कारण कंपन्या क्षमता वाढवण्यासाठी आणि एआयसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्या कामकाजाची पुनर्रचना करत आहेत.
Microsoft Jobs Cuts : गेल्या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची वाढ
गेल्या वर्षीचा विचार करता मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये आठ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा सेंटर पायाभूत सुविधांमध्ये 80 अब्ज गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
Meta Lay Off : मेटामध्ये 3600 कर्मचाऱ्यांना नारळ
आयटी क्षेत्रात काहीशी मंदी असल्याचं चित्र असून अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचं धोरण अवलंबलं आहे. या आधी जानेवारी महिन्यात मेटा कंपनीमध्ये 3600 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला होता. मेटा कंपनीने कर्मचाऱ्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारे हा निर्णय घेतला होता.
अधिक पाहा..
Comments are closed.