भिवंडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बांगलादेशी समजून तिघांना जबर मारहाण
ठाणे : भिवंडी शहरातील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा शेजाऱ्याकडून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली. या चिमुरडीला 20 वर्षांच्या नराधमाने घरी नेऊन विनयभंग केला. त्यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर जमलेल्या जमावाने तीन लोकांना बांगलादेशी असल्याचं समजून जबर मारहाण केली. यासीन शेख असे विनयभंग करणाऱ्या तरुणाचे नाव असून सध्या तो फरार आहे.
नऊ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग झाल्याच्या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या प्रमाणात स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. तेथील जमावाने घरी राहणाऱ्या तिघांना बांगलादेशी असल्याचे समजून जबर मारहाण केली. सध्या याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांना ताब्यात घेतलं आहे. मात्र हे सर्व बांगलादेशी नसून झारखंड येथील रहिवासी असल्याचे तपासात उघड झाले आहे.
भिवंडी शहरातील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीचे आई-वडील कामावर गेले होते. त्यावेळी घरात 9 वर्षीय चिमुरडी आणि तिचा लहान भाऊ एकटे असल्याचे पाहून शेजारी राहणाऱ्या तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावली आणि स्वतःच्या घरी नेले. त्यानंतर या तरुणाने त्या मुलीचे वस्त्र उतरवून तिच्यासोबत आश्लिल चाळे केले.
हा सर्व प्रकार तिच्या अल्पवयीन मुलीच्या लहान भावाने पाहिला आणि आई-वडील घरी आल्यानंतर त्यांच्या कानावर घातला. तेव्हा आई वडिलांसह स्थानिक त्या तरुणाच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले. मात्र हा तरुण तेथून फरार झाला होता. परंतु त्या तरुणासह घरात राहणाऱ्या तिघांना जमावाने बांगलादेशी समजून जबर मारहाण केली.
या घटनेची माहिती तात्काळ भिवंडी शहर पोलिस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता हे बांगलादेशी नसून ते साहेबगंज, थाना नादानगर झारखंड येथील निवासी असल्याच उघड झाले.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत आरोपी यासीन सोभारुख शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत .
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.