लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर गुन्हा दाखल
मीरा भाईंदर बातम्या: मीरा भाईंदरमध्ये काशिमीरा परिसरातील काशीगाव पोलीस ठाण्यात एका तरुणीच्या तक्रारीवरून शाबास रज्जाक शेख याच्यासह त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा तसेच गर्भपातासाठी भाग पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर धर्मांतरासाठी ही दबाव टाकल्याचा आरोप पिडीतेने केला आहे.
2023 मध्ये आरोपीने लग्नाचे आश्वासन देत शोषण केल्याचा आरोप
तक्रारदार तरुणीच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये मालाड येथील एका खासगी कंपनीत काम करत असताना तिची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. 2023 मध्ये आरोपीने लग्नाचे आश्वासन देत विश्वास संपादन केला आणि त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तिने केला आहे. पुढे आरोपीने मीरा रोड परिसरात भाड्याचे घर घेऊन दिले असून दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या काळात ती दोन वेळा गर्भवती राहिली होती, मात्र आरोपीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा दावा तिने केला आहे. तसेच लग्नासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
काशीगाव पोलिसांकडून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु
दरम्यान, 28 मे रोजी आरोपीच्या घरी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याचाही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणी काशीगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
गतिमंद मुलाचा आजार बरा करण्याचे अमिष दाखवून साडेसहा लाख रुपयांची फसवणूक
गतिमंद मुलाचा आजार बरा करण्याचे आणि भावाचे लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवून भोंदू बाबाने एका कुटुंबाची साडेसहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेरमध्ये उघडकीस आला आहे. एवढेच नाही तर, मुलाला जिवंत मारण्याची धमकी देऊन भोंदूबाबाने पीडित महिलेवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात मुख्य भोंदू बाबा, त्याचा मुलगा आणि महिला साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय पीडित शेतकरी महिलेचा 17 वर्षांचा मुलगा हा मतिमंद आहे.
वैद्यकीय उपचार करूनही त्याच्यात सुधारणा होत नव्हती, तसेच शेतीत पिके येऊनही घरातील कर्ज फिटत नव्हते. याच दरम्यान पीडितेचा भाऊ याचेही वय होऊनही लग्न जमत नव्हते. कौटुंबिक अडचणींनी खचलेल्या या महिलेला पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती येथील राजू दिवटे, त्याचा मुलगा शशिकांत दिवटे आणि त्यांची महिला सहकारी शोभा तरटे हे देवऋषी (देवभगत) असून ते अडचणींवर तोडगा काढतात, अशी माहिती मिळाली होती. पीडितेने 2020 मधील कोरोना काळापासून या भोंदूबानांकडे जाण्यास सुरुवात केली. त्यावेळी संशयित भोंदूबाने, “तुमच्या कुटुंबाला मांढरदेवीच्या काळुबाईची बाधा आहे, त्यासाठी होमहवन आणि पूजा करावी लागेल,” असे सांगितले. मुलाच्या उपचारासाठी 3 ते 4 लाख आणि भावाच्या लग्नासाठी दीड लाख रुपये खर्च येईल, असे सांगून त्यांनी पीडितेकडून मुलाचे आणि भावाचे फोटो तंत्र-मंत्र करण्यासाठी मागवून घेतले.. सुरुवातीला पूजा साहित्याच्या नावाखाली शोभा तरटे हिने 10 हजार रुपये घेतले. एवढं करून फरक पडत नसल्याने महिलेला आपली फसवणूक झाल्याचे कळले. त्यानंतर तिने पारनेर पोलिसात गुन्हा दाखल केला. दरम्यान रात्री उशिरा या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.