तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारता गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका; 33 जण अटकेत, 28 दुकानं सील
मुंबई : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) आयुक्तपदी धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संबंधित विभागातील गैरप्रकार आणि अवैध धंद्यांवर कारवाईचा धडका सुरु झाला आहे. तुकाराम मुंढे यांची गेल्याच आठवड्यात आपत्ती व्यवस्थापन विभागातून अन्न व औषध प्रशासन विभागात बदली करण्यात आली होती. त्यानंतर, पदभार स्वीकारताच त्यांनी खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेत कामकाज सुरू केले. आपल्या कामाची पद्धत पहिल्याच दिवसापासून अवलंबात आणत तुकाराम मुंढेंनी राज्यातील अवैध गुटखा, मेडिकल कंपन्यांसह हॉटेल व्यवसायिकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. आत्तापर्यंत 28 दुकाने सील करण्यात आली असून 33 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
तुकाराम मुंढेंच्या आदेशान्वये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम विभागाने हाती घेतली असून आत्तापर्यंत राज्यभर 32 आस्थापनांवर छापे टाकण्यात आले आहेत. या सर्वच ठिकाणी नियमभंग आढळल्याने थेट कारवाई करण्यात आली. या कारवाईत 6 लाख 17 हजार 761 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विभागाने आत्तापर्यांत राज्यात 28 आस्थापना सील केल्या असून 33 आरोपींना अटक केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली संबंधितांवरही गुन्हेदेखील दाखल झाले आहेत. अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गतही कठोर कारवाई करण्यात येत असून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात प्रशासनाचा दणका बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाला. यापुढेही अन्न व औषध प्रशासन विभागाची ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती आहे.
भिवंडीत मोठी कारवाई, मिथेनॉल जप्त
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूचे सेवन केल्यामुळे तब्बल 22 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण ‘मृत्यू तांडवा’नंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या प्रकरणाचे भिवंडी कनेक्शन शोधून काढत एक मोठी कारवाई केली. एफडीएचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर भिवंडीत मिथेनॉलचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
मुंढेंनी 25 मे रोजी पदभार स्वीकारला
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा नवीन कार्यभार स्वीकारला आहे. पदभार हाती घेताच त्यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कडक इशारा दिला होता. त्यांनी सर्व विभागांतील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तातडीने धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत कडक निर्देश दिले. आयुक्तांच्या या आदेशानंतर यंत्रणेनं कमालीची तत्परता दाखवत बृहन्मुंबईकोकण, पुणेनाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच विभागांमध्ये एकाच वेळी धडक कारवाई केली.
आणखी वाचा
Comments are closed.