मिर्झापूर द मुव्हीची बाॅक्स ऑफिसवर घोडदौड कायम; लवकरच 250 कोटींचा टप्पा गाठणार
मिर्झापूर द मुव्हीने बॉक्स ऑफिसवर आपली दमदार घोडदौड कायम ठेवली आहे. ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय मालिकेचा मोठा चाहतावर्ग चित्रपटासाठी थिएटरकडे वळताना दिसत असून, वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी चित्रपटाने तब्बल 13.50 कोटींची कमाई केली आहे. आठव्या दिवशी चित्रपटाने 9.50 कोटींचा व्यवसाय केला होता. त्यानंतर नवव्या दिवशी कमाईत वाढ होत 13.50 कोटींवर पोहोचली. त्यामुळे नऊ दिवसांतील चित्रपटाचे नेट कलेक्शन 171.45 कोटींवर गेले आहे.
चित्रपटाच्या एकूण कमाईनेही मोठा टप्पा गाठला आहे. हिंदुस्थानातील ग्रॉस कलेक्शन 204.39 कोटी, तर परदेशातील कमाई 42 कोटी झाली आहे. त्यामुळेच आता मिर्झापूर द मुव्हीची आतापर्यंतची जागतिक कमाई 246.39 कोटी इतकी झाली आहे. लवकरच आता हा चित्रपट 250 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजला गेल्या काही वर्षांत मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेचा फायदा चित्रपटाला होताना दिसत आहे. मालिकेतील कालीन भैय्या, गुड्डू पंडित यांसारखी पात्रे आणि त्यांचे संवाद प्रेक्षकांच्या मनात चांगलेच रुजले आहेत. चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्या तरी मालिकेच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता कायम आहे.
Comments are closed.