अमित शाहांच्या निवासस्थानावरुन चक्रं फिरली, ‘त्या’ बैठकीनंतर बीसीसीआयचा नवा अध्यक्ष ठरला?
मिथुन मन्हास बीसीसीआय अध्यक्ष: गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटविश्वात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा अध्यक्ष कोण होणार, याची चर्चा सुरु आहे. या पदासाठी अनेक बड्या नावांची चर्चा सुरु होती. मात्र, या शर्यतीत शेवटच्या क्षणी कोणालाही फारशी अपेक्षा नसलेले भारताचे माजी वलयांकित रणजी क्रिकेटपटू मिथुन मनहास (Mithun Manhas) यांनी बाजी मारल्याचे सांगितले जात आहे. मिथुन मनहास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी (BCCI President) निवड जवळपास निश्चित झाली आहे. दिल्लीत पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत मनहास यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास तीन आठवडे हे पद रिक्त होते. आता 28 सप्टेंबर रोजी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) होणार आहे. या सभेत मिथुन मनहास यांच्याकडे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिली जाऊ शकतात. सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये बीसीसीआयचा प्रचंड प्रभाव आहे. अशा परिस्थितीत मिथुन मनहास यांच्यासारख्या खेळाचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या आणि तरुण व्यक्तीकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद जाणे, हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे.
Who is Mithun Manhas: कोण आहेत मिथुन मनहास?
मिथुन मनहास हे रणजी क्रिकेटमधील वलयांकित नाव आहे. मिथुन मनहास यांनी भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिथुन मनहास यांचे नाव आदराने घेतले जाते. मिथुन मनहास यांनी 1997 साली दिल्लीच्या रणजी संघाकडून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर मिथुन हे दिल्लीच्या रणजी संघाचा अविभाज्य भाग होऊन गेले. 2007,2008 हा मिथुन मनहास यांच्या रणजी कारकीर्दीतील सुवर्णकाळ होता. 2007 मध्ये मिथुन मनहास यांनी दिल्लीच्या संघाला 16 वर्षांनी रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तब्बल दोन दशकांच्या आपल्या कारकीर्दीत मिथुन मनहास यांनी प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये 9714 धावा केल्या. यामध्ये 27 शतक आणि 49 अर्धशतकांचा समावेश होता. नंतरच्या टप्प्यात ते जम्मू-काश्मीरच्या संघाकडूनही क्रिकेट खेळले. 2016 साली त्यांच्या पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळला होता.
IPL Tournament: आईपीएल आणि प्रशिक्षकपदाची कारकीर्द
मिथुन मनहास हे आयपीएल स्पर्धेतही खेळले होते. त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांचे प्रतिनिधित्व केले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मिथुन मनहास यांनी प्रशिक्षक म्हणून नव्या अध्यायाचा प्रारंभ केला. 2018 साली ते दिल्ली रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले. यानंतर त्यांनी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाच्या प्रशिक्षक टीमचा भाग होते. नुकत्याच झालेल्या आयपीएल हंगामात ते गुजरात टायटन्स संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक होते.
Mithun Manhas: मिथुन मनहास यांच्या निवडीमागे राजकीय समीकरणे
बीसीसीआय आणि राजकीय व्यक्तींचे संबंध हे पूर्वीपासून आहेत. त्यामुळे बीसीसीआयचा अध्यक्ष निवडताना राजकीय समीकरणे जुळणे तितकेच महत्त्वाचे होते. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनही मिथुन मनहास यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी चर्चा झाल्याचे समजते. मिथुन मनहास यांच्याकडे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे आल्यास पहिल्यांदाच दिल्ली रणजी क्रिकेट संघातील खेळाडू इतक्या मोठ्या पदावर पोहोचणार आहे. आजघडीला जागतिक क्रिकेटविश्वात बीसीसीआयचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्षपद हे महत्त्वाचे मानले जाते. मिथुन मनहास हे सध्या जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे प्रशासक आहेत.
https://www.youtube.com/watch?v=z0zc9isgl_i
आणखी वाचा
बीसीसीआयचा अध्यक्ष कोण होणार? हरभजन सिंगचं नाव चर्चेत, सौरव गांगुलीही शर्यतीत, 28 तारखेला निवडणूक
आणखी वाचा
Comments are closed.