महागडा ड्रेस, हिऱ्याची अंगठी, समुद्रकिनाऱ्यावर सोहळा अन् 48 लाख खर्च करत ‘तिने’ स्वत:शी बांधली लग्नगाठ

लग्न म्हटलं की नवरा आणि नवरी आलीच. पण विवाहसंस्थेच्या या परंपरेला फाटा देत पण एका महिलेने स्वत:शीस विवाह केल्याचे समोर आले. बोनी लॉकेट (वय – 38) असे या महिलेचे नाव असून ती स्पेनमधील इबिजा येथील रहिवासी आहे. लग्नासाठी तिने महागडा डिझायनर ड्रेस खरेदी केला होता. एवढेच नाही तर हिऱ्याची अंगठीही घेतली होती. समुद्रकिनाऱ्यावर लग्नाचा सुंदर सोहळाही आयोजित केला होता. या अनोख्या विवाहावर बोनीने तब्बल 48 लाख रुपये खर्च केले. जगभरात सध्या याच विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे.

मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर बोनीचे वैयक्तिक आयुष्य प्रचंड चढ-उतारांचे आणि संघर्षाचे राहिले आहे. आयुष्यात वारंवार मिळालेला धोका आणि तुटलेल्या नात्यांच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी तिने स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

आजवर प्रत्येक नात्यामध्ये माझी फक्त फसवणूकच झाली, असे बोनीने सांगितले. 11 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2013 मध्ये बोनीने लग्न केले. पण लग्नानंतर 9 महिन्यातच तिला पतीचे बाहेर दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचे कळले. विशेष म्हणजे बोनीच्या कट्टर विरोधक असलेल्या महिलेसोबतच पतीचे संबंध होते. हे सत्य समोर येताच बोनीने घटस्फोट घेतला. यातून सावरण्यासाठी तिने दुसऱ्या व्यक्तीला जवळ केले. मात्र त्यानेही तिचा विश्वास घात केला. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या बोनीच्या मनात आत्महत्येचेही विचार येत होते.

एक वेळ अशी आली होती की मी जगण्याची उमेद हरवून बसले होते आणि आत्महत्येचे विचार मनात येत होते, असे बोनीने सांगितले. लागोपाठ झालेली फसवणूक आणि त्यानंतर जवळच्या नातेवाईकाच्या निधनानंतर बोनी नैराश्यात गेली होती. मित्र, थेरपी आणि पाळीव कुत्र्यामुळे यातून आपण हळूहळू सावरलो आणि सुखी राहण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही याची जाणीव झाल्याचे तिने सांगितले.

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडिया स्क्रोल करत असताना बोनीला एक पिवळ्या हिऱ्याची अंगठी आवडली. ती अंगठी तिला इतकी भावली की तिने विचार केला, ‘कोणीतरी ती आपल्याला भेट देईल याची वाट का पाहायची?’ तिने स्वतःच सुमारे 24 हजार डॉलर्स (23 लाख रुपये) खर्च करून ती अंगठी खरेदी केली. त्यानंतर तिला तिच्या सुटकेसमध्ये वर्षानुवर्षे जपून ठेवलेला तिचा जुना वेडिंग ड्रेस आठवला. हा डिझायनर ड्रेस सुमारे 20 हजार डॉलर्सचा (17 लाख रुपये) होता. जुन्या वाईट आठवणी पुसून टाकून त्याच ड्रेसमध्ये स्वतःशीच लग्न करावे आणि आयुष्याला एक सकारात्मक वळण द्यावे, अशी कल्पना तिच्या मनात आली.

30 मे रोजी इबीजा येथील अत्यंत देखण्या ‘काला डी हॉर्ट’ बीचवर बोनीने लग्नसोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला तिचे केवळ 8 अत्यंत जवळचे मित्र उपस्थित होते. एका विवाह अधिकाऱ्याच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बोनीने आरशात स्वतःकडे पाहत लग्नाचे वचन घेतले. “मी नेहमी स्वतःवर प्रेम करेन, स्वतःच्या आनंदाची काळजी घेईन आणि दुसऱ्या कोणाला खुश करण्यासाठी स्वतःला कधीही कमी लेखणार नाही,” अशी शपथ तिने घेतली.

“आज मी स्वतःची निवड केली आहे. याचा अर्थ माझा प्रेमावरचा विश्वास उडाला आहे असा नाही, तर सर्वात आधी स्वतःवर प्रेम करणे किती गरजेचे आहे, हे मी शिकले आहे,” असे बोनी म्हणाली. भविष्यात जर एखादी योग्य व्यक्ती भेटली, तर ती पुन्हा नात्यात येण्यास तयार आहे. हे लग्न कोणत्याही पुरुषाच्या विरोधात नसून, केवळ स्वतःप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग होता, असे तिने स्पष्ट केले.

Comments are closed.