अफगाणिस्तान मालिकेआधी मोठा निर्णय! मोहम्मद सिराजच्या हाती संघाचे कर्णधारपद

दुलीप ट्राॅफी 2026 ची सांगता झाल्यानंतर, देशांतर्गत क्रिकेटपटूंचे लक्ष आता आगामी रणजी हंगामाकडे लागले आहे. विविध राज्यांच्या संघांनी या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. भारतीय कसोटी संघाचा प्रमुख सदस्य आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आता आपल्या राज्य संघाचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी स्वीकारणार आहे.
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने 2026-27 च्या रणजी ट्राॅफीसाठी मोहम्मद सिराजची संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
आगामी रणजी हंगामात मोहम्मद सिराज हैदराबाद संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने शुक्रवारी हा निर्णय घेतला. ‘रेड-बॉल’ (प्रथम श्रेणी) हंगामासाठी सिराज संघाची धुरा सांभाळणार आहे, तर डावखुरा वेगवान गोलंदाज चामा मिलिंद याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रणजी स्पर्धेत हैदराबादचा समावेश एलिट गट ब मध्ये करण्यात आला आहे. 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत त्यांचा पहिला सामना त्रिपुरा विरुद्ध होणार आहे. कर्णधार म्हणून सिराजचा हा पहिला पूर्ण हंगाम असेल. यापूर्वी, मागील हंगामातील शेवटच्या दोन सामन्यांसाठी सिराजकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्याला विशेष प्रभाव पाडता आला नव्हता.
मागील रणजी हंगामात, राहुल सिंगकडून सूत्रे स्वीकारल्यानंतर सिराजने दोन सामन्यांत हैदराबादचे नेतृत्व केले होते. सिराजच्या नेतृत्वाखाली हैदराबादला मुंबईविरुद्ध नऊ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता, तर छत्तीसगडविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला होता. परिणामी, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सिराजच्या नेतृत्वाखाली हैदराबादला अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही.
मोहम्मद सिराजकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव आहे आणि त्याने कसोटी क्रिकेटमध्येही प्रभावी कामगिरी केली आहे. मात्र, कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्याला अद्याप मिळालेली नाही. आता, संपूर्ण रणजी हंगामात हैदराबादचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सिराजवर असेल. त्यामुळे, एक लीडर म्हणून आपली छाप पाडण्याची आणि स्पर्धेत हैदराबादला पुढे नेण्याची मोठी संधी त्याच्याकडे आहे.
सिराजने आतापर्यंत हैदराबादसाठी 21 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात 83 विकेट्स घेतले आहेत. गोलंदाज म्हणून त्याची कामगिरी प्रभावी आहे; आता त्याच्यासमोर कर्णधार म्हणूनही आपली छाप पाडण्याचे आव्हान आहे.
Comments are closed.