मोहम्मद सिराजची आग ओकणारी गोलंदाजी! जैस्वाल, रहाणेसारखे स्टार ठरले अपयशी, BCCI ला दाखवला आरसा

हैदराबादने मुंबईला हरवले SMAT मोहम्मद सिराज सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची दहशत दाखवून दिली. सुपर लीग टप्प्यात हैदराबादने मुंबईवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे सिराज. सिराजच्या वेगवान व अचूक गोलंदाजीपुढे मुंबईची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली, तर हैदराबादच्या फलंदाजांनी लक्ष्य अगदी सहज गाठले. या सामन्याने सिराज फक्त रेड बॉलचाच नाही, तर टी20 क्रिकेटमधलाही मोठा मॅच-विनर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं.

गंभीर–आगरकरांना सिराजचा थेट इशारा

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळतो आहे, पण या मालिकेत भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक होताना दिसतेय. विशेष म्हणजे, या मालिकेत मोहम्मद सिराजचा समावेश नाही. हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी बराच काळ सिराजला टी20 संघाबाहेर ठेवलं आहे. सिराजने भारतासाठी शेवटचा टी20 सामना खेळून सुमारे 17 महिने उलटले आहेत. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो जबरदस्त फॉर्ममध्ये असून सातत्याने प्रभाव पाडतो आहे.

मोहम्मद सिराजला टी-20 वर्ल्डकपमध्ये संधी मिळणार का?

मात्र, एवढी दमदार कामगिरी करूनही सिराज सध्या भारताच्या टी-20 संघाचा भाग नाही, ही बाब अनेक चाहत्यांना खटकत आहे. “फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज बाहेर आणि प्रयोगांवर भर?” असा थेट सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. सिराजची सध्याची लय, डेथ ओव्हर्समधील नियंत्रण आणि दबावात विकेट काढण्याची क्षमता पाहता, तो टी-20 फॉरमॅटमधून का बाहेर आहे, हा प्रश्न पडतो. आगामी टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर सिराजसारखा अनुभवी आणि फॉर्ममध्ये असलेला वेगवान गोलंदाज संघाबाहेर ठेवणं धोकादायक ठरू शकतं, असं मत अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ मांडत आहेत.

नायक मोहम्मद सिराज

मुंबईविरुद्धच्या या सामन्यात हैदराबादच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो मोहम्मद सिराज ठरला. त्याने केवळ 3.5 षटकांत 21 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. सिराजने सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियन यांना बाद केलं. विशेष म्हणजे, सूर्यांश शेडगे आणि शार्दुल ठाकूर यांना त्याने सलग दोन चेंडूवर तंबूत धाडलं, ज्यामुळे मुंबईचा डाव 131 धावांत गुंडाळला गेला. सिराजसोबतच तनय त्यागराजन यानेही 2 विकेट्स घेत मोलाची साथ दिली.

हैदराबादचा एकतर्फी विजय

मुंबईचे स्टार फलंदाज या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. यशस्वी जैस्वाल 29, सरफराज खान फक्त 5 आणि अजिंक्य रहाणे अवघे 9 धावा करू शकले. याउलट, हैदराबादने केवळ 11.5 षटकांत 1 विकेट गमावत 132 धावा करत सामना खिशात घातला. अमन राव याने नाबाद 52, तर तन्मय अग्रवाल याने 75 धावांची दमदार खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. या विजयासह हैदराबादने महत्त्वाचे 4 गुण आपल्या खात्यात जमा केले.

सिराजने मनेही जिंकली….

उत्कृष्ट गोलंदाजीसाठी मोहम्मद सिराजला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. मात्र, पुरस्कार स्वीकारताना त्याने मोठेपणा दाखवत सगळ्यांची मनं जिंकली. सिराजने हा पुरस्कार आपल्या सहकारी तन्मय अग्रवाल याच्यासोबत शेअर केला, कारण तन्मयनेही या सामन्यात संघासाठी जबरदस्त फलंदाजी केली होती. सिराजच्या या खेळाडूवृत्तीची सोशल मीडियावर जोरदार प्रशंसा होत आहे.

हे ही वाचा –

Match Fixing Indian Cricket : क्रिकेटविश्व हादरलं! मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात भारताचे 4 खेळाडू, मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.