NZvsIND: “मोहम्मद सिराज खेळला नाही, म्हणून वेलिंग्टन कसोटी ड्रॉ….” बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचे वक्तव्य
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने टी२० आणि एकदिवसीय मालिका जिंकली. त्यानंतर खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मात्र अनिर्णीत राहिला. वेलिंग्टन येथे खेळला गेलेला हा सामना शेवटच्या दिवसापर्यंत खेळला गेला. यामध्ये भारताने पहिल्या डावात ७२० धावांचा डोंगर उभा केला होता, मात्र शेवटच्या दिवशी पाहुण्या संघाला विजयासाठी आवश्यक अशा ८ विकेट्स काढता आल्या नाही. या सामन्यातून मोहम्मद सिराजला वगळल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तो असता तर सामन्याचा निकाल काही औरच असता, असा सूरही काहींनी सामन्यानंतर लगावला. यावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मंगळवारी (२४ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना सांगितले की, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून अंतिम ११ खेळाडूंमधून वगळल्याबद्दल वेगवान गोलंदाज सिराजला वादात ओढले जाऊ नये. अंतिम ११ खेळाडू निवडण्याचा निर्णय संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार घेतात.
झाले असे की, सिराजला वगळल्याने काहींनी त्याला राजकिय वळण दिले होते. त्यामध्ये मुस्लिम संबंध जोडण्याचा काहींनी प्रयत्न केला होता. यावर शुक्ला यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सिराजला राजकीय वादात ओढले जाऊ नये आणि या मुद्द्याला अवाजवी महत्व दिले जाऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
वेलिंग्टनचा कसोटी सामना अनिर्णीत राहिली, यासाठी सिराजची अनुपस्थिती जबाबदार नाही. खेळपट्टीची स्थिती आणि इतर घटकांच्या आधारावर अंतिम ११ खेळाडूंची निवड असते. हा प्रशिक्षक आणि कर्णधार यांचा निर्णय असतो. खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश होता आणि कोणाचा नव्हता, यावरून राजकिय किंवा इतर वाद निर्माण करणे योग्य नाही. हे सिराजसाठीही चांगले नाही आणि त्यालाही हे नक्कीच आवडणार नाही, असे शुक्ला यांनी एएनआयशी बोलताना म्हटले.
कॉंग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी सिराजला वगळण्यामागचे कारण सांगताना धार्मिक भेदभावाचा आरोप केला होता. तसेच त्यांनी मोहम्मद शमी आणि सरफराज खान यांचेही नाव चर्चेत ओढले. असुद्दीन ओवैसी यांनीही अशाच प्रकारची वक्तव्ये केली होती.
पहिल्या कसोटी सामन्याची स्थिती पाहिली, तर न्यूझीलंडने पहिल्या डावात ३६८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ९ विकेट्स गमावून ७२० धावसंख्येवर डाव घोषित केला.
अंतिम दिवसाच्या सुरूवातीला न्यूझीलंडची दुसऱ्या डावात स्थिती २ बाद ११९ अशी होती, मात्र तरीही भारताला विजय मिळवता आला नाही. अखेरीस न्यूझीलंडने १२० षटकांत ५ विकेट्स गमावून २३९ धावा केल्या आणि सामना संपण्यास एक तासाचा अवधी शिल्लक असताना भारतीय कर्णधार शुभमन गिलने विरोधी संघाच्या फलंदाजांशी हस्तांदोलन केले.
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी चिवट खेळी केली. मिचेलने १८६ चेंडूंत नाबाद ४९ धावा, तर फिलिप्सने १२६ चेंडूंत नाबाद २६ धावा केल्या होत्या.
या सामन्यात भारताने जसप्रीत बुमराह, आकाश दीप, अंशुल कंबोज आणि प्रसिद्ध कृष्णा या वेगवान गोलंदाजांना खेळवले होते.
आता दोन्ही संघांचा शेवटचा आणि मालिका निर्णायक सामना २७ नोव्हेंबरपासून क्राईस्टचर्च येथे खेळला जाणार आहे.
Comments are closed.