वैभवच्या वादळी खेळीनंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूची जीभ घसरली? वयावरून केला मोठा दावा
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तन्वीर अहमदने असा दावा केला आहे की, वैभव सूर्यवंशीचे वय 15 वर्षे नसून 20 ते 21 वर्षे आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या एका सामन्यात वैभवने अवघ्या 52 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावले आणि आपल्या खेळीदरम्यान 28 षटकार मारले. या धडाकेबाज फलंदाजीचे कौतुक करण्याऐवजी, तन्वीर अहमदने वैभवच्या वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याचे वय पडताळण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तानसाठी 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला तन्वीर अहमदने एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवर सांगितले की, वैभवचे वय 15 वर्षे नसून 20 ते 21 वर्षे असावे. त्याने असा युक्तिवाद केला की, एखादा खेळाडू कितीही प्रतिभावान असला तरी, 15 वर्षांचा मुलगा अशा प्रकारे 28 षटकार मारू शकत नाही. त्याच्या मते, 15 वर्षांच्या मुलाचे शरीर विशेषतः त्याचे हात आणि खांदे इतके शक्तिशाली असणे शक्य नाही. त्यामुळे, वैभवचे वय 15 वर्षे असल्यावर तन्वीरने अविश्वास दर्शवला असून, तो 20 किंवा 21 वर्षांचा असावा, असे म्हटले आहे.
जेव्हा कार्यक्रमाच्या सूत्रधाराने वैभवच्या वयाची पडताळणी करण्याबाबत विचारले, तेव्हा तन्वीरने आपली भूमिका कायम ठेवली आणि आग्रह धरला की, त्याची वैद्यकीय चाचणी केली जावी, कारण त्याला वैभव 15 वर्षांचा असल्याचे अजिबात पटत नाही.
दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीच्या वयाची पडताळणी आवश्यक कागदपत्रे आणि अधिकृत तपासणीद्वारे आधीच झालेली आहे. वैभवचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला आहे, ज्यावरून हे स्पष्ट होते की तो सध्या 15 वर्षांचा आहे. त्याचे जन्म प्रमाणपत्र आणि शालेय दस्तऐवजांमध्येही हेच वय नमूद केलेले आहे. तसेच, त्याची ‘बोन टेस्ट’ (हाडांची चाचणी) देखील करण्यात आल्याचे वृत्त आहे. याशिवाय, त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या वयाची माहिती आणि त्यांची शैक्षणिक कागदपत्रेही समोर आली आहेत. संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या वैभवच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर, त्याच्या वयाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, फलंदाजी करताना तो ज्या ताकदीने आणि आक्रमकतेने खेळतो, त्यावरून केवळ त्याच्या वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही.
Comments are closed.