हिंदुस्थान-पाकिस्तान खेळाडूंचे वर्तन लाजिरवाणे; हरभजनचा ICC आणि क्रिकेट बोर्डांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन
हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी मैदानावर केलेले वर्तन लाजिरवाणे असून, यामुळे युवा पिढीसमोर चुकीचा आदर्श निर्माण होत आहे, अशी टीका माजी हिंदुस्थानचा फिरकीपटू हरभजन सिंगने केली. दोन्ही देशांच्या खेळाडूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि संबंधित क्रिकेट बोर्डांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्याने केली.
दोहा येथे रविवारी झालेल्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत हिंदुस्थान अ संघाला पाकिस्तान अ संघाकडून 48 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये अनेकदा शाब्दिक चकमकी झाल्या. हिंदुस्थान अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा आणि पाकिस्तान अ संघाचा कर्णधार अब्दुल समद यांनी नाणेफेकीवेळी हस्तांदोलनही केले नव्हते. त्यानंतर मैदानावरही खेळाडूंमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
या घटनांवर प्रतिक्रिया देताना हरभजन म्हणाला, “CC आणि संबंधित क्रिकेट बोर्डांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी विजय मिळवल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रिया तसेच मैदानावर घडलेल्या घटना योग्य नव्हत्या. हे लाजिरवाणे असून नव्या पिढीसमोर चुकीचा आदर्श निर्माण करणारे आहे. HSBC गोल्फ लीगच्या उद्घाटनप्रसंगी मुंबईत पत्रकारांशी बोलताना हरभजनने ही भूमिका मांडली.
HSBC गोल्फ लीगचा पाचवा हंगाम 15 शहरांत रंगणार

HSBC गोल्फ लीगच्या पाचव्या हंगामात यंदा देशातील 15 शहरांमध्ये 18 स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईतील बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब येथे हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. अंतिम विजेत्यांना स्कॉटलंडमधील सेंट अँड्र्यूज येथे 11 ते 18 जुलै 2027 दरम्यान होणाऱ्या 155 व्या द ओपन स्पर्धेचा विशेष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
Comments are closed.