मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन '44वी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा' 2026-27, अद्विक उपांत्य फेरीत
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि सुधीर मोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४४ व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२६-२७ मध्ये अद्विक इंटरप्रायझेसने व्यावसायिक गटाच्या उपांत्य फेरीत, तर स्वस्तिक मंडळाने महिला गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
विक्रोळी (प.) येथील महापालिका खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत अद्विक इंटरप्रायझेसने चुरशीच्या लढतीत मंगल मोटर्सचा २६-२५ असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. मध्यंतराला दोन्ही संघ १७-१७ अशा बरोबरीत होते. अद्विकच्या रोहन शेडगे आणि प्रज्ञेश पिळणकर यांनी संयमी खेळ करत विजयात मोलाचा वाटा उचलला. मंगल मोटर्सकडून अनुराग फुलारेने एकाकी झुंज दिली.
महिला गटात स्वस्तिक मंडळाने निर्विघ्न स्पोर्ट्सचा ४७-२६ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मध्यंतराला १५-१८ अशा पिछाडीवर असलेल्या स्वस्तिकने उत्तरार्धात जोरदार पुनरागमन केले. दिशा तिरवटकर आणि पूजा मलाई यांनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर तीन लोण चढवले. त्यामुळे सामना स्वस्तिकच्या बाजूने एकतर्फी झुकला. निर्विघ्नकडून भूमी गोस्वामी आणि ऋतुजा साबळे यांना उत्तरार्धात अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
पुरुषांच्या द्वितीय श्रेणीत नेताजी सुभाष स्पोर्ट्सने रावडी स्पोर्ट्सचा ३६-१३ असा, तर संकल्प मंडळाने एस. बी. स्पोर्ट्सचा १८-११ असा पराभव केला. या विजयांसह दोन्ही संघांनी स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
Comments are closed.