आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले
पती-पत्नीचा भांडण विकोपाला जाऊन पत्नीने अखेर आपल्या दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. निकिता अमरदीप भूरे (वय 25) असे मृत महिलेचे नाव असून तिच्यासोबत तिची दोन लहान मुले शिवानी आणि शिवांश यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे ही घटना घडली. रविवार संध्याकाळपासून निकीताचे तिच्या पतीसोबत वाद सुरू होते. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास निकिता भुरे या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. सकाळी त्या तिघांचा शोध घेण्यात आला, मात्र काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर दुपारनंतर घराशेजारील विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खरोसा गावासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास किल्लारी पोलीस हे करीत आहेत
Comments are closed.