‘घरं कशी मिळतात बघतो, तू घुसखोर आहेस का?, इथूनच उचलतो’, म्हाडाच्या संजीव जयस्वालांची रहिवाशांच्

संजीव जयस्वाल मोतीलाल नगर पुनर्विकास: मोतीलाल नगरमधील पुर्नविकास प्रकल्पाच्या सार्वजनिक बैठकीत नागरिकांशी बोलताना म्हाडा प्राधिकरणाचे सीईओ संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी धमकी दिल्याचे आणि  धार्मिक तेढ उत्पन्न होईल, असे वक्तव्य केल्या आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मोतीलाल नगरमधील सार्वजनिक बैठकीत नागरिकांशी बोलताना झालेल्या वादानंतर म्हाडाचे (Mhada) उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याविरोधात प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. बैठकीदरम्यान नागरिकांना धमकी दिल्याचा आरोप करत तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत 37 सदस्यांनी स्वाक्षरी केलेली पाच पानी तक्रार गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या रहिवाशांनी आम्हाला प्रकल्पावर धमकावणारा अधिकारी नको, अशी भूमिका घेतली आहे. (Motilal nagar redevelopment)

मोतीलाल नगरमधील सार्वजनिक बैठकीत पुनर्विकासासंदर्भात नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर वाद निर्माण झाला. याचदरम्यान संजीव जयस्वाल यांनी नागरिकांशी आक्षेपार्ह भाषेत संवाद साधत धमकीवजा वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच बैठकीत केलेल्या काही वक्तव्यांमुळे धार्मिक तेढ निर्माण होईल, असा दावा करत त्याबाबतही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. या तक्रारीत बैठकीतील संपूर्ण घटनाक्रम नमूद करण्यात आला असून, जयस्वाल यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, अशी भीती तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे केवळ आक्षेपार्ह वक्तव्य नव्हे, तर धमकी आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, 37 सदस्यांच्या स्वाक्षरीसह दाखल झालेल्या या तक्रारीमुळे मोतीलाल नगरमधील वाद आता थेट पोलीस तपासाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. गोरेगाव पोलीस या तक्रारीवर काय भूमिका घेतात आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai News: बैठकीत नेमकं काय घडलं?

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मोतीलाल नगरचा पुनर्विकास होत आहे. या प्रकल्पाचा आराखडा कंत्राटदार असलेल्या अदानी समूहाकडून तयार करण्यात आला आहे. मोतीलाल नगरमधील रहिवाशी 2400 चौरस फुटांच्या घरासाठी आग्रही आहेत. मात्र, म्हाडाने ही मागणी मान्य केली नव्हती. शुक्रवारी अदानी समूहाने तयार केलेल्या पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी काही रहिवाशांनी 2400 चौरस फुटांच्या घरांच्या मागणीचे फलक दाखवण्यास सुरुवात केली. त्यामुळे संजीव जयस्वाल संतापले. त्यांनी रहिवाशांना थेट धमकावण्यास सुरुवात केली. फलक दाखवणाऱ्या एका दाढीवाल्या तरुणाकडे पाहून त्यांनी म्हटले की, ‘तू घुसखोर आहेस का? तुझे आयकार्ड दाखव. तू घुसखोर असशील तर तुला येथूनच उचलेन’, असे संजीव जयस्वाल यांनी म्हटले. एवढेच नव्हे तर जयस्वाल यांनी पोलिसांना संबंधित तरुणाला ताब्यात घ्यायला सांगितले.

यानंतरही संजीव जयस्वाल धमकीच्या स्वरातच नागरिकांशी बोलत राहिले. त्यांनी आवाज चढवत म्हटले की, ठीक आहे, तुम्हाला पुनर्विकास नको ना, मी गौतम अदानींना तसे सांगतो. तुम्ही बैठकीचे इतिवृत्त परस्पर जाहीर करता, तुमच्याविरोधात मी पोलिसांत तक्रार दाखल करेन. ज्यांनी घरे भाड्याने दिली असतील, त्यांना घरे मिळणार नाहीत. तुमची घरं भाडोत्र्‍यांच्या नावावर करतो. तुमच्या घरांचे हस्तांतर कसे होते,  ते मी पाहतो. अनधिकृत बांधकाम केले आहे का,  याचे सर्वेक्षण मी सुरु करेन, किती अनिवासी क्षेत्र वाढवले आहे, हे  पाहायला लावू नका, असे संजीव जयस्वाल यांनी म्हटल्याचा आरोप आहे. यानंतर रहिवाशांनी पोलीस ठाण्यात जाऊन संजीव जयस्वाल यांच्याविरोधात जातीय तेढ पसरवल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करता येत नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा

देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, ’15 मिनिटांचे शहर’ म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर

आणखी वाचा

Comments are closed.