एमपीएससीमध्ये पुन्हा गडबड, कृषी सेवा परीक्षेच्या मूल्यांकनात गोंधळ
राज्य आणि केंद्राच्या अखत्यारीतील विविध परीक्षांमधील गडबडगोंधळाची मालिका सुरूच आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कृषी सेवा मुख्य परीक्षा-2024च्या मूल्यांकन प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये मोठी घसरण झाली असून सर्व उत्तरपत्रिकांची फेरतपासणी किंवा पुनर्मूल्यांकन करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या गुणपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या आधारे केलेल्या मूल्यांकनात अनेक विसंगती आढळून आल्या आहेत. मूल्यमापन करताना परीक्षकाने एका उमेदवाराला 135 गुण दिले होते. त्यानंतर नियामकाने हे गुण कमी करून 101 केले. दुसऱ्या नियामकाने ते आणखी कमी करून 68वर आणले. त्यामुळे मूळ परीक्षकाने दिलेल्या गुणांमध्ये तब्बल 67 गुणांची घट झाली. ही घट मूळ गुणांच्या जवळपास निम्मी आहे. त्यामुळे मूल्यांकन प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. पहिल्या परीक्षकाने इतके गुण कोणत्या निकषांच्या आधारे दिले? त्यांनी दिलेले गुण योग्य की नंतर मिळालेले गुण योग्य, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याशिवाय काही प्रश्नांची उत्तरे अपेक्षित पद्धतीने लिहिलेली नसतानाही अनेक विद्यार्थ्यांना भरभरून गुण देण्यात आल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या
सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी करा
परीक्षक व नियामकांच्या गुणांतील तफावतीची चौकशी करा
मॉडरेशन प्रक्रियेची स्वतंत्र पडताळणी करा
शंका निरसन होईपर्यंत निकालावर आधारित पुढील प्रक्रिया स्थगित ठेवा.
संबंधित विषयाच्या तज्ञांकडूनच मूल्यांकन झाले होते का? असेल तर त्याची माहिती जाहीर करा.
Comments are closed.