IPL 2026 – वानखेडेवर ‘थाला’चा कडक सराव! मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत कमबॅक करण्याची शक्यता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन कट्टर संघात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दुखापतीमुळे स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला मुकलेला चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी याने वानखेडे मैदानावर जोरदार सराव सुरू केला आहे. त्यामुळे तो मुंबईविरुद्ध खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धोनीचा ‘विंटेज’ अवतार

44 वर्षांचा धोनी मंगळवारी संध्याकाळी वानखेडेच्या मैदानावर सरावासाठी उतरला तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. स्नायूंच्या दुखापतीतून सावरल्यानंतर धोनीने सुमारे अर्धा तास यष्टीरक्षणाचा सराव केला. विशेष म्हणजे, सराव सत्रादरम्यान त्याने मुंबईच्या सरफराज खानला फलंदाजीचे काही मोलाचे सल्लेही दिले. यष्टींमागे धोनीची तीच जुनी चपळाई पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

चेन्नईसाठी आशेचा किरण

यंदाचा हंगाम चेन्नई सुपर किंग्ससाठी आतापर्यंत खडतर राहिला आहे. 6 सामन्यांपैकी केवळ 2 विजय मिळवून गुणतालिकेत संघ आठव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यात फॉर्मात असलेला आयुष म्हात्रे दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत धोनीच्या पुनरागमनामुळे संघाच्या फलंदाजीला आणि मनोधैर्याला मोठी ताकद मिळू शकते.

मुंबईच्या ताफ्यात ‘विल जॅक्स’ची एन्ट्री

दुसरीकडे, घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आणि पुन्हा विजयी ट्रॅकवर आलेल्या मुंबई इंडियन्सची ताकदही वाढली आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स संघात सामील झाला आहे. टी-20 विश्वचषक 2026 मधील शानदार कामगिरीनंतर जॅक्सकडून मुंबईला मोठ्या अपेक्षा आहेत.

Comments are closed.