मुहूर्त ट्रेडिंगचा वेळ बदलला, नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून तारखेसह वेळापत्रक जारी
मुंबई : नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून दिवाळीत साधारणपणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग सत्र राबवलं जातं. नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं परिपत्रक जारी केलं आहे. त्या परिपत्रकानुसार दिवाळीनिमित्त विशेष मुहूर्त ट्रेडिंग 21 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2024 ला 1 नोव्हेंबरला मुहूर्त ट्रेडिंग सत्र सायंकाळी 6.00 वाजता आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी 21 ऑक्टोबरला दुपारी पावणे दोन वाजता मुहूर्त ट्रेडिंग सुरु होईल आणि ते पावणे तीन वाजता संपेल.
मुहूर्त ट्रेडिंग वेळापत्रक Muhurat Trading 2025 Date and Time
नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं मुहूर्त ट्रेडिंग संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. त्या परिपत्रकानुसार 21 ऑक्टोबर 2025 ला मुहूर्त ट्रेडिंग सत्र राबवण्यात येईल. प्री-ओपनिंग सत्र दुपारी दीड वाजता सुरु होईल. तर, बाजार दुपारी 1:45 वाजता खुले होईल आणि दुपारी 2:45 वाजता बंद होणार आहे.
What is Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?
बीएसई आणि एनएसईवर भारतीय पंचांगानुसार दिवाळी पाडव्यापासून हिंदूंचं नवं आर्थिक वर्ष सुरु होतं. त्यानिमित्तानं एका तासाचे विशेष ट्रेडिंग सत्र राबवलं जातं. याला मुहूर्त ट्रेडिंग म्हटलं जातं.
मुहूर्त ट्रेडिंगद्वारे शुभ मुहूर्तावर गुंतवणुकीची संधी गुंतवणूकदारांना उपलब्ध करुन दिली जाते. मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र एक तासाचं असतं. दिवाळीनिमित्त गुंतवणूकदार गुंतवणूक किंवा त्यांच्याकडील शेअरची विक्री करुन नव्या आर्थिक प्रवासाला सुरुवात करु शकतात.
मुहूर्त ट्रेडिंगला सांस्कृतिक महत्त्व आहे. या कालावधीत केलेली गुंतवणूक वैभवसंपन्नता आणि चांगल्या भविष्यासाठी महत्त्वाची मानली जाते. मुहूर्त ट्रेडिंग हे परंपरेचा गौर करण्यासाठी घेतलं जातं.
मुहूर्त ट्रेडिंगचा वेळ बदलला
2024 मुहूर्त ट्रेडिंग सायंकाळी 6 ते 7 वाजता आयोजित करण्यात आलं होतं. साधारणपणे गेल्या 50 वर्षांपासून मुहूर्त ट्रेडिंग भारतीय स्टॉक एक्सचेंजवर आयोजित केलं जातं. नव्या आर्थिक वर्षाची प्रतिकात्मक सुरुवात मानत आर्थिकदृष्ट्या प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या जातात.
मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून 1957 पासून करण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्तानं नियमित गुंतवणूकदार आणि गुंतवणुकीचा प्रवास सुरु करणाऱ्यांसाठी नवी परंपरा मुहूर्त ट्रेडिंगद्वारे सुरु करण्यात आली आहे. 1992 पासून नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर देखील मुहूर्त ट्रेडिंग राबवलं जातं. साधारणपणे मुहूर्त ट्रेडिंग सायंकाळी आयोजित केलं जायचं यंदा मात्र दुपारी मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आलं आहे. दरम्यान, भारतीय शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून सावरल्याचं चित्र आहे. यंदा भारतीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजार सावरला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.