मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी बाजाराची सकारात्मक सुरुवात, सेन्सेक्स अन् निफ्टीवर काय घडलं?


मुंबई : दिवाळी निमित्त शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगचं विशेष सत्र आयोजित करण्यात आलं होतं. या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले. गुंतवणूकदारांनी नव्या संवत वर्ष 2082 ची सुरुवात सकारात्मक अंदाजात केली. सेन्सेक्समध्ये 62.97 अंकांची वाढ झाली. तर, निफ्टी 50 मध्ये 25.45 अंकांची वाढ झाली. आज सेन्सेक्स  84426.34 वर बंद झाला तर निफ्टी 50 निर्देशांक 25868.6 अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराला उद्या दिवाळी पाडव्यानिमित्त सुट्टी असेल.

मुहूर्त ट्रेडिंगमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. निफ्टी मिडकॅप 65.05 अकांनी वाढून 59409.55 अंकांवर तर निफ्टी स्मॉलकॅप 94.50 अंकांनी वाढून 18300.65 वर बंद झाला. सेक्टोरेल निर्देशांक पाहिले असता निफ्टी आयटी 7.15 अंकांच्या तेजीसह  35299.75 वर बंद झाला. निफ्टी बँक 26 अंकांच्या घसरणीसह  58007.20 वर बंद झाला. आजची गुंतवणूकदारांची खरेदी मिडिया मेटल आणि फार्मा शेअरवर केंद्रीत होती.  रिअल्टी आणि फार्मा सेक्टरमध्ये घसरण झाली.

मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सर्वाधिक फायदा कोणाला?

शेअर बाजारात सर्वाधिक तेजी बजाज फिनसर्व्ह मध्ये पाहायला मिळाली. हा शेअर 1.11 टक्क्यांनी वाढून 2163.15 वर बंद झाला. इन्फोसिसच्या शेअरमध्ये 0.72 टक्क्यांची तेजी येऊन स्टॉक 1472 रुपयांवर पोहोचला. एक्सिस बँकेच्या शेअरमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. बँकेचा शेअर  1234 रुपयांवर पोहोचला.  महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये 0.60 टक्क्यांची तेजी दिसून आली. टाटा मोटर्समध्ये 0.55 टक्क्यांची तेजी येऊन शेअर 401.90 रुपयांवर बंद झाला. बँकिंग आणि इन्फ्राच्या स्टॉकमध्ये सुधारणा होईल.

एचडीएफसी बँकेचा शेअर 0.40 टक्क्यांनी वाढून 1007.30 रुपयांवर पोहोचला. पॉवर ग्रीडच्या स्टॉकमध्ये 0.38 टक्क्यांनी 288.80, एल अँड टी  0.34 टक्क्यांच्या वाढीसह  3887 रुपयांवर पोहोचला. याशिवाय अदानी पोर्टस, बीईएल, स्टेट बँक ऑफ इंडिया, सन फार्मा, टेक महिंद्राच्या स्टॉक मध्ये तेजी पाहायला मिळाली.

मुहूर्त ट्रेडिंगला या स्टॉकमध्ये घसरण

मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात थोडी घसरण पाहायला मिळाली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर 0.11 टक्क्यांनी घसरुन 2146.15 रुपयांवर आला. आयटीसीच्या शेअरमध्ये 0.11  टक्क्यांची घसरण होऊन 412.50 रुपयांवर आला.  अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअरमध्ये 0.21 टक्क्यांची घसरण होऊन तो 12310 रुपयांवर बंद झाला. एशियन पेंटस, टीसीएस, भारती एअरटेल, मारुती सुझूकी,आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक,कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.