लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
पुणे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपायच्या अगोदर प्राप्त होईल, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं. त्या पुणे येथे पत्रकारांसोबत बोलत होत्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच पहिल्यापासून निधी दिला जातो, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं. नमो शेतकरी योजनेतून ज्या महिलांना एक हजार रुपये मिळतात त्यांना 500 रुपये मिळतील हे योजनेचे दोन शासन निर्णय होते त्यामध्येच निश्चित करण्यात आलं होतं, असं देखील त्यांनी सांगितलं.
लाडकी बहीण योजनेचा निर्णय वाचला तर गोष्टी समजतील. ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात, त्यांना एक हजार रुपये त्यातून मिळतात. शासनाच्या योजनांमधून किमान 1500 रुपये त्यांना मिळावेत असा दृष्टिकोन आहे. त्यामुळं हजार रुपये त्यांना नमो शेतकरी आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2 कोटी 47 लाख आहेत. ऑक्टोबर 2024 महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता त्यावेळी 2 कोटी 33 लाख महिला होत्या. ही योजना राबवताना कुचराई होत नाही. ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ दिला जात आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.
लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 9 महिन्यांचे 13500 रुपये मिळाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च 2025 ची रक्कम 8 मार्च ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं एकाचवेळी देण्यात आली होती. आता लाडक्या बहिणींना अक्षय्य तृतीयेच्या च्या निमित्तानं त्यावेळी दिला जाईल अशी माहिती आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामध्ये या योजनेचा वाटा महत्त्वाचा होता. लाडक्या बहिणींना महायुतीचं सरकार आल्यास दरमहा 2100 रुपये देऊ, असं आश्वासन देण्यात आलं होत. मात्र, महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊन देखील लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये पुन्हा वाढ न करण्यात आल्यानं विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात आले होते. यावर जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो, असं उत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं होतं.
https://www.youtube.com/watch?v=b8mt-0fmzug
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.