मुंबईच्या चौपाट्यांची सुरक्षा टाईट! सहा चौपाट्यांवर 106 लाईफ गार्ड
पावसाळा दोन महिन्यांवर आल्यामुळे पालिकेने पावसाळापूर्व तयारी जोरदार सुरू केली असून सहा चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी 106 लाइफ गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. लाईफ गार्डना जेटकीज, सहा रेस्क्यू बोट, सहा कयाक्स, सहा सर्फ बोर्डसह बचावकार्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे चौपाट्यांवर मुंबईकर-पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे होणारे अपघात टळण्यास मोठी मदत होणार आहे. अग्निशमन दलाच्या देखरेखीखाली हे लाइफ गार्ड आपली जबाबदारी पार पाडणार असल्याची माहिती अग्निशमन दल प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली.
मुंबईत गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा प्रमुख सहा चौपाट्यांवर पावसाळ्यात मोठय़ा संख्येने पर्यटक-मुंबईकर गर्दी करतात. मात्र या वेळी काही अतिउत्साही आणि बेजबाबदार पर्यटकांमुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होतो. समुद्रात 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याच्या दिवशी पालिकेकडून धोक्याचा इशारा दिला जातो. शिवाय सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होते. तसेच अतिवृष्टीप्रसंगी समुद्राला भरती असल्यास पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याने धोक्याची स्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेच्या माध्यमातून लाईफ गार्ड तैनात ठेवण्यात येत आहेत.
मदतीसाठी अग्निशमन दलाची रेस्क्यू टीम
n संपूर्ण पावसाळ्यात लाईफ गार्डला आवश्यकता असेल तेव्हा सहकार्य करण्यासाठी अग्निशमन दलाची रेस्क्यू टीम तयार ठेवण्यात येणार आहे. तर अतिवृष्टीप्रसंगी आवश्यकता भासल्यास लाईफ गार्डच्या माध्यमातून फायर ब्रिगेडला सहकार्य केले जाणार आहे.
n लाईफ गार्डला बॅकअप देण्यासाठी फायर ब्रिगेडच्या फ्लड रिस्पॉन्स टीम गवालिया टँक फायर स्टेशन, वांद्रे फायर स्टेशन, पुर्ला फायर स्टेशन, मालाड फायर स्टेशन, दहिसर फायर स्टेशन आणि गोराई फायर स्टेशनवरून घटनास्थळी धाव घेणार आहेत.
Comments are closed.