बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत लक्ष्मीदर्शन, आधी चौकशीची नोटीस, मग मतदारांच्या घरी पैशांची पाकिटं
मुंबई सर्वोत्तम निवडणूक: राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी सोमवारी मुंबईत मतदान पार पडत आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीत बेस्ट कर्मचारी संघटनेतील तब्बल 15 हजार कर्मचारी मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) उत्कर्ष पॅनेलसमोर महायुतीच्या नेत्यांनी सहकार समृद्धी पॅनेल रिंगणात उतरवले आहे. गेल्या 25 वर्षांपासून बेस्ट पतसंस्थेवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व होते. या काळात पतसंस्थेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर मतदानाला अवघे 24 तास शिल्लक असताना दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 21 संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी नोटीस धाडली होती. यावरुन भुवया उंचावल्या असतानाच आता मतदानाच्या आदल्या दिवशी सहकार समृद्धी पॅनेलने मतदारांना बंद लिफाफ्यातून पैसे पाठवल्याची बाब समोर आली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले. (BEST employees co operative credit society Election news)
आज बेस्ट पतपेढीची निवडणूक होणार आहे. अनेक पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत अतिशय घाणेरडे राजकारण खेळले जात आहे. मतदारांना पैशांचं आमिष दाखवले जात असून त्यांच्या घरी पैसे पाठवले जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. दत्तात्रय पेडणेकर यांच्या घरी सहकार समृद्धीचे एक पॅम्प्लेट पाठवण्यात आले होते. या पॅम्प्लेटच्या आत एक पांढऱ्या रंगाचा लिफाफा होता. त्यामध्ये पाचशेच्या दोन नोटा होत्या. इतक्या घाणेरड्या पद्धतीने निवडणूक लढवली जात असतील तर आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे. आम्ही यासंदर्भात त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत. मात्र, बेस्टचे सगळे मतदार सुज्ञ आहेत, ते अशा भुलथापांना बळी पडणार नाहीत, धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होईल. या निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध महायुती प्रणित संघटनांचा सामना पाहायला मिळणार आहे. ठाकरे बंधूंनी उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत उतरवले आहे. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीने सुद्धा ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणित श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना तर शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल बाजी मारणार की सहकार समृद्धी पॅनल? याची उत्सुकता असणार आहे. या दोन पॅनल व्यतिरिक्त बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनल यांनी सुद्धा आपले 21 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गेली 25 वर्षे शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेत असल्यामुळे बेस्ट पतपेढीमध्ये सुद्धा मागील नऊ वर्षापासून बेस्ट कामगार सेनेचे वर्चस्व आहे.
* 15093 मतदार ( यामध्ये बेस्ट कर्मचारी चालक वाहक बेस्ट विद्युत पुरवठा कर्मचारी)
* 29 – मतदान केंद्रावर मतदान होणार ( हे मतदान केंद्र बहुतांश बेस्ट डेपो आहेत)
* 21 जणांचं पॅनल दोन्ही बाजूंनी उभा आहे
* सकाळी आठ वाजल्यापासून मतदान सुरू होईल
* 19 ऑगस्टला मतमोजणी होईल
BEST employees co operative credit society Election: कोणत्या संघटनांचे किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ?
उत्कर्ष पॅनल (ठाकरे बंधू)
एकूण 21 उमेदवार
19- बेस्ट कामगार सेना ( ठाकरेंची शिवसेना संघटना)
2- मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना ( मनसे संघटना)
सहकार समृद्धी पॅनल – एकूण 21 उमेदवार
8 – श्रमिक उत्कर्ष सभा ( भाजप प्रणित संघटना )
5 – समर्थ बेस्ट कामगार संघटना ( नितेश राणे यांची भाजप प्रणित संघटना )
4 – राष्ट्रीय कर्मचारी सेना ( शिंदे शिवसेना प्रणित संघटना )
3 – एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन
1 – इलेक्ट्रिक युनियन
दि बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनल
* 21 – शशांकराव पॅनल यांचे उमेदवार असतील
https://www.youtube.com/watch?v= pcpm3tmsc74
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.