उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी द्या, आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबईतील उपकरप्राप्त (सेस) जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या तातडीने दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मुंबईत सुमारे 13,500 हून अधिक उपकरप्राप्त (सेस) इमारती आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील कलम 79 (अ) व 79 (ब) अंतर्गत प्रक्रिया न्यायालयीन स्थगितीमुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक इमारती अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.
विशेषतः पावसाळाजवळ येत असल्याने या इमारतींची तातडीने दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
पत्रात पुढे म्हटले आहे की, दुरुस्तीच्या कामांसाठी म्हाडाकडून प्रति चौरस मीटर 4,000 रुपये इतका खर्च करण्याची परवानगी आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे प्रकरण विशेष म्हणून विचारात घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मुंबईतील हजारो कुटुंबे या धोकादायक इमारतींमध्ये राहत असून त्यांचे जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केले.
उपकरप्राप्त (सेस) पागडी इमारतींच्या दुरुस्तीकरीता म्हाडातर्फे विशेष निधी देऊन ‘विशेष प्रकरण’ म्हणून सहानुभूतीपूर्वक विचार करून पावसाळ्यापूर्वी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी विनंती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्यांना पत्राद्वारे केली. pic.twitter.com/a8S8agGHZd
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 24 एप्रिल 2026
Comments are closed.