Sangameshwar News – उन्हाळी सुट्टीत चिपळूण-दिवा मेमू स्पेशल ट्रेन, 1 मे पासून धावणार
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने चिपळूण ते दिवा दरम्यान विशेष मेमू (MEMU) ट्रेन चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही गाडी 1 मे 2026 पासून 7 जून 2026 पर्यंत आठवड्यातून तीन दिवस धावणार असून, यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील चाकरमान्यांसह स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक 01160 चिपळूण-दिवा मेमू स्पेशल दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दुपारी 15.30 वाजता चिपळूण स्थानकातून सुटेल आणि रात्री 23.10 वाजता दिवा जंक्शन येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01159 दिवा-चिपळूण मेमू स्पेशल दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री 23.25 वाजता दिवा येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता चिपळूणला पोहोचेल. या विशेष गाडीला चिपळूण आणि दिवा दरम्यान अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पाचंद आणि निळजे अशा सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
ही गाडी एकूण 18 फेऱ्या करणार असून 8 डब्यांच्या मेमू रेकने ही सेवा चालवली जाणार आहे. सुट्ट्यांच्या काळात होणारी गर्दी आणि नियमित गाड्यांमधील वेटिंग लिस्ट पाहता, या विशेष मेमू ट्रेनमुळे मध्यमवर्गीय प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. प्रामुख्याने खेड आणि चिपळूण भागातील प्रवाशांना मुंबईच्या उपनगरापर्यंत थेट पोहोचण्यासाठी ही गाडी अत्यंत सोयीची ठरणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाचे कोकणवासीयांकडून स्वागत होत असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments are closed.