पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्…, गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात को

मुंबई : लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपीविरुद्धचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. मात्र, शिक्षेच्या बाबतीत काही अनुषंगिक मुद्द्यांचा विचार करत जन्मठेपेऐवजी १२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याचा आदेश खंडपीठाने दिला.(Mumbai Court Cuts Sexully assult Convicts Life Term Cites Essay On Mahatma Gandhi)

पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार

घाटकोपरमधील चाळीत राहणाऱ्या या आरोपीने डिसेंबर २०१६ मध्ये शेजारील पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला होता. त्यावेळी आरोपीचे वय २० वर्षे होते. २०२० मध्ये विशेष पोक्सो न्यायालयाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले.

न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने विशेष न्यायालयाचा दोषनिर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले. सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांवरून गुन्हा संशयाच्या पलीकडे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. पीडित मुलगी न्यायालयात साक्ष देताना अल्पवयीन असली तरी तिचा जबाब सुसंगत आणि स्पष्ट होता. तिच्याकडून खोटा आरोप लावला गेला असण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचेही आदेशात म्हटले आहे. शिक्षेबाबत निर्णय घेताना खंडपीठाने काही बाबींची नोंद केली. आरोपी सुमारे नऊ वर्षांहून अधिक काळ कारावास भोगत आहे. गुन्ह्यावेळी त्याची पूर्वीची गुन्हेगारी नोंद नव्हती. तसेच कोविड काळात त्याला जामीनही मिळालेला नव्हता, हा मुद्दाही विचारात घेण्यात आला.

तुरुंगवासादरम्यान आरोपीने विविध बौद्धिक आणि शैक्षणिक उपक्रमांत सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्रे सादर केली होती. पुस्तक विश्लेषण कार्यक्रम, निबंध स्पर्धा तसेच महात्मा गांधींच्या विचारांच्या अभ्यासासंदर्भातील उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याची नोंद खंडपीठाने घेतली. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून शिक्षेत काही प्रमाणात सवलत देण्यात आली.गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने किमान दहा वर्षांपेक्षा जास्त शिक्षा आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. मात्र, न्यायाच्या दृष्टीने १२ वर्षांचा कारावास पुरेसा ठरेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

प्रकरणाची पार्श्वभूमी

९ डिसेंबर २०१६ रोजी आरोपी आपल्या नातेवाईकांच्या घरी एकटा असताना पीडित मुलगी पाणी पिण्यासाठी तेथे गेली होती. त्यावेळी हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. घटनेनंतर मुलीने आईला माहिती दिली आणि त्यानंतर घाटकोपर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष न्यायालयाने डिसेंबर २०२० मध्ये आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २०२३ मध्ये या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते.

आणखी वाचा

Comments are closed.