एमसीए निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात, पात्र उमेदवारांची यादी संदर्भात कोर्टाचे आदेश


एमसीए निवडणूक: मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) निवडणुकीचा  (Mumbai Cricket Association MCA) वाद आता मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) पोहोचला असून तूर्त उमेदवारांची यादी जाहीर करण्यास अंतरिम मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी (6 नोव्हेंबर) होणाऱ्या सुनावणीनंतर या निवडणूक (MCA Election) प्रक्रियेचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यानघटनेचे उल्लंघन होणे आणि नियमबाह्यपणे 155हून अधिक क्रिकेट क्लबला मतदार यादीत समाविष्ट करणे या मुद्द्यांवर एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांनी अॅड. स्नेहा फेणे यांच्यामार्फत रिट याचिकेद्वारे निवडणूक प्रक्रियेला आव्हान दिले आहे.

अशातच 24 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होण्यापूर्वीच हळबे यांनी आक्षेप नोंदवूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याविषयी कारणमीमांसेसह रीतसर आदेश दिला नसल्याचा युक्तिवाद त्यांनी मांडला. तर ‘प्रारुप मतदारयादीविषयी 17 ते 20 ऑक्टोबर यादरम्यान आलेल्या आक्षेपांचा विचार केल्यानंतरच अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे. त्या प्रक्रियेत याचिकाकर्त्यांच्या आक्षेपांचाही विचार केला’, असे म्हणणे निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे अॅड. विश्वनाथ पाटील यांनी मांडले. मात्र, आपल्या आक्षेपांबाबत कारणमीमांसा देऊन आदेश काढला नसल्याचा युक्तिवाद हळबे यांच्यातर्फे मांडण्यात आला.

त्यानंतर मंगळवारीच संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आक्षेपांचा विचार करून कारणमीमांसेसह आदेश याचिकाकर्त्यांना कळवण्याची हमी निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे न्यायालयात देण्यात आली. तर 4 नोव्हेंबर रोजी छाननीअंती उमेदवारांची यादी जाहीर होणार होती. मात्र 6 नोव्हेंबरच्या पुढील सुनावणीपर्यंत ती यादी जाहीर करू नये, असे निर्देशही खंडपीठाने दिले.

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मतदार यादीचा कार्यक्रम बदलला आहे. आयोगाच्या अधिसूचनेनुसार, ‘प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी आता 14 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल’. यापूर्वीच्या वेळापत्रकात बदल झाल्याने निवडणूक प्रक्रियेला आणखी उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन कार्यक्रमानुसार, मतदार याद्यांवरील हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 22 नोव्हेंबरपर्यंत असेल.

प्राप्त झालेल्या हरकती निकाली काढून 6 डिसेंबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर, 8 डिसेंबरला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल आणि 12 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, मतदार नोंदणीसाठीच्या कट-ऑफ डेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.