स्वतः च्याच घरात चोरी, हिरे व्यापारी वडिलांच्या तिजोरीतून मुलाने उडवले साडेतीन कोटी, लेकाला अटक
मुंबई गुन्हा: दक्षिण मुंबईत एका मुलाने आपल्याच वडिलांची तिजोरी लुटल्याची घटना समोर आली आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका पंचरत्न बिल्डिंग येथील ऑपेरा हाऊसमध्ये ही घटना घडलीय. पंचरत्न बिल्डिंग, ऑपेरा हाऊसमध्ये तक्रारदार विपुल जोगाणी यांचे कार्यालय असून ते हिरे व्यापारी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिले आहे. दरम्यान हिरे व्यापारी असलेल्या विपुल जोगाणी यांच्या मुलाने आपल्याच वडिलांची तिजोरीवर हात साफ केल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बनावट चावीचा वापर करून वडिलांच्या तिजोरीवर डल्ला
दरम्यान, या प्रकरणी माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, वडिलांच्या व्यवसायातील प्रगती आणि ऑफिसच्या तिजोरीत करोडो रुपयांची संपत्ती पाहून मुलगा निर्ममने घरातील तिजोरी साफ करण्याचा कट रचला. यासाठी मुलाने वडिलांच्या नकळत साबणावर छापून वडिलांच्या तिजोरीची डुप्लिकेट चावी बनवली. अशातच 20 फेब्रुवारीच्या रात्री याच बनावट चावीचा वापर करून वडिलांच्या तिजोरीतून साडेतीन कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. वडील विपुलच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तपासात हा चोर दुसरा कोणी नसून आपलाच मुलगा असल्याचे समोर आले. तर आपल्याच मुलाने तिजोरी लुटल्याचे समजताच व्यावसायिकासह पोलिसांना ही धक्का बसला आहे. या प्रकरणी डीबी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून निर्मम या मुलाला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
ऑर्केस्ट्रा बारवर महानगरपालिकेची कारवाई
मीरा भाईंदर महानगरपालिकेने काशिमिरा परिसरातील हायवेलगत असलेल्या एका ऑर्केस्ट्रा बारवर मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बारमध्ये नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू असल्याची तक्रार प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, महापालिकेच्या पथकाने अचानक धाड टाकत कारवाई केली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत अनेक नियमभंग आढळून आल्याचे सांगितले असून, संबंधित बारवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेमुळे परिसरातील अन्य बेकायदेशीर बार चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नियमबाह्यरित्या चालणाऱ्या अशा कोणत्याही आस्थापनांना सोडले जाणार नाही आणि भविष्यातही अशा कारवाया सुरूच राहतील.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.