धक्कादायक! मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये घरकाम करणाऱ्या महिला कामगाराची हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल
मुंबई क्राईम न्यूज : मिरा-भाईंदरमधील काशीमिरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 40 वर्षीय महिला घरकामगाराची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमन नावाची ही महिला चंदेश अॅकॉर्ड या निवासी संकुलात अनेक घरांमध्ये घरकाम करत होती. मंगळवारी चंदेश अॅकॉर्ड बिल्डिंग क्रमांक 27 मधील एका घरात तिची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.
पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरु
आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले असून, तिच्या पोटात दोन, छातीत एक आणि मानेवर एक असे गंभीर वार करण्यात आले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला तात्काळ गुरुकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच काशीमिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मालेगावात सात ते जणांच्या टोळक्याने केली एकाची हत्या
नाशिकच्या मालेगावात मागील भांडणाची कुरापत काढून सात ते जणांच्या टोळक्याने एकावर लाठ्या – काठ्या, कोयता, तलवारीने सपासप वार करून ठार केले. मारहाणीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सलीम शेख असे खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. मालेगावच्या अख्तराबाद भागातून सलीम शेख जात असताना सहा ते सात जणांनी त्याचा पाठलाग करून निर्दयीपणे त्याच्यावर वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मृत सलीम शेख याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हल्लेखोराविरुद्ध पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
जालना शहरातील दुखी नगर येथे दोन गटांमध्ये लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण
जालना शहरातील दुखी नगर येथे दोन गटांमध्ये लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण झाली आहे. यामध्ये 3 जणांनी एका तरुणाला लाठ्या काठ्यांनी मारहाण सुरू केली, या नंतर दोन गटात ही तुंबळ मारामारी झाली. या घटनेचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. दोन्ही गटातील तीन तरुण जखमी झाले असून, कौटुंबिक वादातून ही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे ,रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नाही.
आणखी वाचा
Comments are closed.