‘मी सीबीआयचा अधिकारी बोलतोय, तुम्हाला अटक होणार’; निवृत्त RBI कर्मचाऱ्याला धमकी देत ऑनलाईन गंडा

मुंबई क्राईम न्यूज: मुंबईतील (Mumbai) अंधेरी पूर्व परिसरात स्वतःला CBI अधिकारी असल्याचे सांगत एका निवृत्त RBI कर्मचाऱ्याची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने अटक करण्याची धमकी देत भीती निर्माण केली आणि ऑनलाईन व्यवहारांद्वारे तब्बल 1 लाख 10 हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation) मधील अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल असल्याचे सांगत अटक होऊ शकते, अशी धमकी देण्यात आली.

Mumbai Crime News: 1 लाख 10 हजार रुपये उकळले

या धमकीमुळे घाबरलेल्या तक्रारदारावर आरोपीने पैसे पाठवण्याचा दबाव टाकला. भीतीपोटी तक्रारदारांनी सुरुवातीला Google Pay द्वारे 20 हजार रुपये पाठवले. यानंतर 4 मार्च रोजी आरोपीने पुन्हा वारंवार फोन करून आणखी पैसे मागितले. 1 मार्च ते 4 मार्च या कालावधीत आरोपीच्या सांगण्यावरून तक्रारदारांनी सहा वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण 1 लाख 10 हजार रुपये पाठवले.

Mumbai Crime News: आणखी 1 लाख 50 हजार रुपयांची मागणी

मात्र एवढ्यावरही आरोपी थांबला नाही. त्याने पुढे आणखी 1 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे उपलब्ध नसल्याचे सांगत तक्रारदारांनी त्यानंतर फोन उचलणे बंद केले. दरम्यान, हा प्रकार त्यांनी आपल्या मुलाला सांगितल्यानंतर संपूर्ण घटना सायबर फसवणुकीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

Mumbai Crime News: अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अशा प्रकारच्या धमकीच्या फोन कॉल्सना घाबरून कोणालाही पैसे पाठवू नयेत, तसेच अशा घटना घडल्यास त्वरित पोलीस किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, दोरखंडातून सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही

Crime News: बेडवर झोपलेली तरुणी, अंगावर अर्धवट चादर; दुपारी 12 वाजता हॉटेलवर पोहोचलेल्या मुलीसोबत रात्री 12 वाजता भयानक घडलं, पोलिसही हादरले

आणखी वाचा

Comments are closed.