धक्का लागल्यामुळे वाद, तरुणाने लोखंडी रॉड डोक्यात टाकला, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू
मुंबई क्राइम पार्कसाईट: धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून मुंबईतील ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या (Murder news) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटकोपरच्या सीजीएस कॉलनी परिसरात गुरुवार ही घटना घडली. या घटनेत मयत इसमाचे नाव सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर असे असून ते विक्रोळी पार्कसाईट (Vikhroli Parkiste) परिसरात राहायचे. सुरेंद्र पाचाडकर हे विभागात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या हत्येच्या घटनेने पार्कसाईट परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. (Vikhroli Parksite Murder news)
अमन श्रीराम वर्मा (वय 19) असे सुरेंद्र पाचाडकर यांची हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अवघ्या पाच तासांमध्ये जेरबंद केले. सुरेंद्र पाचाडकर हे गुरुवारी नेहमीप्रमाणे घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात फेरफटका मारण्यासाठी आले होते. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेली सीजीएस कॉलनी मधून चालत जात असताना त्यांना आरोपी अमन वर्माचा धक्का लागला. यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली याचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यावेळी अमनने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून सुरेंद्र यांच्या डोक्यात घातला. यामुळे सुरेंद्र पाचाडकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते खाली कोसळले. स्थानिकांनी याची वर्दी देताच घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या सुरेंद्र पाचाडकर यांना जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. सुमारे 80 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी अमन वर्मा याचा माग काढला. तब्बल पाच तासांनी पोलिसांन अमन वर्मा याला रमाबाई कॉलनी येथून अटक केली. आता त्याच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Shivsena Thackeray Camp: सुरेंद्र पाचाडकर उर्फ ‘महाराजांच्या’ निधनाने पार्कसाईटच्या नागरिकांमध्ये हळहळ
सुरेंद्र पाचाडकर हे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत होते. पार्कसाईट परिसरात एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेनेच्या शाखेत नित्यनियमाने हजेरी लावणारा आणि जमिनीवर उतरुन काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचा लौकिक होता. शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते शिवाजी महाराजांच्या वेशभुषेत चित्ररथावर उभे राहायचे. यामुळे त्यांना ‘महाराज’ या टोपणनावाने ओळखले जायचे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.