फुकटात लोकल प्रवासासाठी Chat GPT वापरलं; बनावट रेल्वे पास बनवला अन् डाव फसला; मुंबईत 22 वर्षीय
मुंबई गुन्हे: आजकाल AI च्या वाढलेल्या सर्रास वापरामुळे फसवणुकीचेही अनेक प्रकार उघडकीस येताना दिसतायत. त्यातलाच एक प्रकार मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकावरून समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर (CSMT) चॅटजीपीटीचा वापर करून बनावट रेल्वे पास तयार करून लोकल ट्रेनने प्रवास केल्याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाविरुद्ध रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आदिल अन्सार खान असे आरोपीचे नाव असून, त्याने मुंब्रा ते CSMT दरम्यान प्रवासासाठी एक महिन्याचा बनावट पास तयार केल्याचे समोर आले आहे. (fake Railway Pass)
नेमका प्रकार काय?
25 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 12 .45 वाजता भायखळा रेल्वे स्थानकावर नियमित तिकीट तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. तिकीट तपासनीस कुणाल सावरडेकर हे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील मुख्य गेटजवळ तिकीट तपासणी करत असताना त्यांनी आदिल खानकडे तिकीट दाखवण्यास सांगितले.
आदिलने आपल्या आयफोन 13 प्रोवर रेल्वे पास दाखवला; मात्र तो अधिकृत UTS मोबाइल अॅपवर नसून केवळ छायाचित्र स्वरूपात असल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर त्याला पुढील तपासणीसाठी तिकीट तपासणी कार्यालयात नेण्यात आले. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर हा पास अधिकृत निकषांनुसार नसून बनावट असल्याचे स्पष्ट केले. तपासात असे निष्पन्न झाले की, खानने एका मित्राच्या मार्गदर्शनाखाली चॅटजीपीटीचा वापर करून हा बनावट पास तयार केला होता. या पासवर 24 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीसाठी मुंब्रा ते CSMT प्रवासाची वैधता दाखवण्यात आली होती .
आतिहुशारी महागात पडली; तरुणावर गुन्हा दाखल
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सावरडेकर यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार CSMT रेल्वे पोलिसांनी खानविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(2) (फसवणूक), 336(3) (बनावट कागदपत्रे तयार करणे) आणि 340(2) (बनावट इलेक्ट्रॉनिक नोंदींचा वापर) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींन्वये गुन्हा नोंदवला आहे.रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, बनावट पासवर अधिकृत सील व माहितीचा समावेश करून तो खरा असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक तपासणीमध्ये हा पास अधिकृत रेल्वे प्रणालीशी संबंधित नसल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी आरोपीविरोधात फसवणूक व बनावट कागदपत्रे वापरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. AI चा गैरवापर करत घडणाऱ्या घटना आजकाल वारंवार समोर येऊ लागल्या आहेत. अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा रेल्वे पोलिसांनी दिला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.