कलिंगडातून विषप्रयोग! धक्कादायक फॉरेन्सिक अहवाल
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने पायधुणीतील अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आणि दोन मुली आयेशा आणि जैनब यांचा मृत्यू झाला होता. कलिंगडमधून विष पोटात गेल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टमनंतर केलेल्या व्हिसेरा चाचणीत समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या करून आत्महत्येचा हा प्रकार असल्याचा तज्ञांचा संशय आहे. अब्दुल्ला यांनी कलिंगडाला विषाचे इंजेक्शन टोचून ते कलिंगड पत्नी व मुलींना दिले व नंतर स्वतः खाल्ले अशी शक्यता आहे.
25 एप्रिल रोजी दोकाडिया कुटुंबाने आपल्या अन्य पाच नातेवाईकांसह रात्री साडेदहाच्या सुमारास जेवण केले होते. जेवणामध्ये त्यांनी बिर्याणी खाल्ली होती. जेवणानंतर त्यांचे नातेवाईक आपापल्या घरी गेले. त्यानंतर दोकाडिया कुटुंबाने मध्यरात्री दीड वाजता आपल्या घरी असलेले कलिंगड खाल्ले होते. पहाटे पाच वाजता चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यांना उलटय़ा होऊ लागल्याने शेजाऱ्यांनी तत्काळ रुग्णालयात नेले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली होती. अन्नविषबाधेमुळे हे मृत्यू झाले असावेत असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. परंतु पोस्टमॉर्टम, व्हिसेरा तपासणीमधून हा वेगळाच प्रकार असल्याचे समोर येत आहे. दोकाडिया कुटुंबियांच्या मृतदेहांचे पोस्टमॉर्टम सर जे. जे. रुग्णालयात केले गेले. प्राथमिक चाचणीत चौघांचीही आतडी, फुप्फुसे आणि मेंदूंवर विषाचा हिरवट थर आढळला. विषाचा प्रभाव त्या अवयवांवर स्पष्ट दिसत होता. ते नेमके कोणते विष होते याचे निदान फॉरेन्सिक प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या सखोल चाचण्यांमधूनच होऊ शकणार आहे.
अब्दुल्लांच्या शरीरात आढळले मॉर्फिन
अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन या वेदनाशामक औषधाचा अंश आढळला. गंभीर शस्त्रक्रियेवेळी किंवा कर्करोगामुळे होणाऱया तीव्र वेदना रोखण्यासाठी मॉर्फिनचा औषध म्हणून वापर केला जातो. त्यामुळे अब्दुल्ला यांच्यासह संपूर्ण दोकाडिया कुटुंबीयांचा वैद्यकीय इतिहास तपासला जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नपाण्याच्या नमुन्यांची तपासणी
अन्न व औषध प्रशासनाने घटनेनंतर दोकाडिया कुटुंबाच्या घरातून बिर्याणी, कलिंगड, कच्चे व शिजवलेले चिकन, तांदूळ व शिजवलेला भात, मसाले, खजूर, फ्रीजमधील आणि माठातील पाणी असे 11 प्रकारचे नमुने गोळा केले होते. त्यांची तपासणी केली जात आहे.
हत्येनंतर आत्महत्या?
पत्नी आणि मुलींना विष घातलेले कलिंगड खाऊ घातल्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून अब्दुल्ला यांनीही तेच कलिंगड खाऊन आत्महत्या केली असावी असा दाट संशय या प्रकरणात व्यक्त करता येऊ शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कारण चौघांपैकी आधी मुली आयेशा आणि जैनब यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अब्दुल्ला यांची पत्नी नसरीन यांचा मृत्यू झाला व सर्वात शेवटी अब्दुल्ला यांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांचे मत आहे. चौघांच्याही अंतर्गत अवयवांवर आढळलेला हिरवट रंगाचा थर हा प्राणघातक बुरशीचाही असू शकतो आणि जहाल विषाचाही असू शकतो असाही निष्कर्ष काढता येऊ शकतो. खरे कारण फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालातूनच स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.
कलिंगडाला लाल रंग आणणारे केमिकल मृत्यूला कारणीभूत नाही
कलिंगडाला लाल गडद रंग यावा म्हणून एरिथ्रोसीन बी हे केमिकल इंजेक्शन वापरले जाते. त्या केमिकलमुळे दोकाडिया कुटुंबाला विषबाधा झाली असावी अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु एरिथ्रोसीन जरी कलिंगडमध्ये टोचले असते तर त्यामुळे उलट्या झाल्या असत्या, मृत्यू झाले नसते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
Comments are closed.