यंदाचा गणेशोत्सव आवाजाच्या मर्यादेत; सकाळी 6 ते रात्री 10पर्यंत 55 डेसिबल, रात्री 10नंतर 45 डेसिबल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईत गणेशोत्सव साजरा करताना मंडळांकडून ‘आवाजा’ची मर्यादा पाळली जाईल, असे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीकडून आज स्पष्ट करण्यात आले. यामध्ये ‘नॉईस पोल्युशन अॅक्ट’नुसार सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 55 डेसिबल तर रात्री 10नंतर 45 डेसिबल आवाजाची मर्यादा राखली जाईल. सर्व मंडळांकडून या नियमांचे पालन केले जाईल, असेही समन्वय समितीकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्यात डीजेच्या आवाजावरून वादविवाद सुरू असताना समन्वय समितीने आज मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. गणेशोत्सवात महाप्रसादाबाबत ‘एफडीए’ने नियमावली थेट जाहीर केली आहे. मात्र गणेशोत्सवाबाबत ‘एफडीए’ला 8 ऑगस्टच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर 12 ऑगस्ट रोजी बैठकीसाठी पत्र देण्यात आले होते. ही बैठक अद्याप झाली नसल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली. उच्च न्यायालयाचे 2012चे निर्देश आणि इन्व्हायरमेंट अॅक्ट 86नुसार आवाजाची मर्यादा मंडळांनी पाळली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

छोटय़ा मंडळांना एफडीएचे नियम जाचक

अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ‘एफडीए’ने मंडळांना महाप्रसाद बनवणाऱ्यांकडे परवाना असणे बंधनकारक केले आहे. मात्र ऐन गणेशोत्सवात छोटय़ा मंडळांना आर्थिक स्थितीमुळे परवानाधारक पुरवठादार नेमणे अशक्य आहे. याबाबत ‘एफडीए’ योग्य निर्णय घेण्याची छोटय़ा मंडळांची मागणी आहे. गणेशोत्सवाबाबत समन्वय समितीसोबत उद्या होणाऱ्या बैठकीत ‘एफडीए’ने योग्य नियमावली देण्याची मागणीही समन्वय समितीने केली आहे.

उंचीबाबतही सर्वसमावेशक निर्णय घ्या

कोर्टाच्या मूर्ती उंचीबाबतच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकार, पालिका आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने योग्य निर्णय घ्यावा, असेही समितीने स्पष्ट केले. यामध्ये मुंबईतील रस्ते, मिरवणुकांच्या मार्गांतील अडथळ्यांचा विचार व्हावा, असेही समितीने म्हटले आहे. तर गणेशोत्सवात वाजवली जाणारी गाणी, कार्यक्रम संस्कृती जपणारे, उत्सवाचे स्वरूप भक्तीपूर्ण असावे, असे आवाहनही समितीकडून मंडळांना करण्यात आले आहे.

Comments are closed.