मुंबईत आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईत शुक्रवारी सकाळपासून पावसाने शहर आणि उपनगर भागाला झोडपले. दरम्यान, हवामान खात्याने शनिवारी, रविवारी असे दोन दिवस मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’चा इशारा दिला आहे. मुंबईत 24 तासांत अति मुसळधार पाऊस पडण्याची आणि ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

किंग्ज सर्कल, हिंदमाता, अंधेरी सब वे, मिलन सब वे येथे पाणी भरल्याने आज वाहतूक मंदावली. तर कुर्ला, शीव, चुनाभट्टी, वडाळा रेल्वे स्थानकांजवळील रुळांवर पाणी साचले. यामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसला.

ठाणे, पालघर जिल्ह्यात शाळांना आज सुट्टी

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी उद्या पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी रात्री उशिरा परिपत्रक काढून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या शनिवारी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

साकीनाका दुर्घटना प्रकरणी कंत्राटदारासह चौघांवर गुन्हा

साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख या पादचाऱ्याचा गुरुवारी मृत्यू झाला. गंभीर दुर्घटनेची दखल घेत महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागाच्या अधिकाऱ्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. महापालिका अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे, साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध आणि तिथे कार्यरत असलेल्या तीन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Comments are closed.