हजारो भाडेकरुंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा; मालमत्तेत काही हिस्सा खरेदी केल्यास घराबाहेर काढता येणार नाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई उच्च न्यायालयाने भाडेकरूंच्या हिताचा एक मोठा निर्णय दिला आहे. जर एखाद्या भाडेकरूने त्याच मालमत्तेची कायदेशीररित्या अंशतः खरेदी केली असेल तर तो केवळ भाडेकरू राहत नाही. त्यामुळे मूळ घरमालक भाडे नियंत्रण कायद्यांतर्गत त्याला घराबाहेर काढू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. जर भाडेकरूने मालमत्तेत मालकी हक्क मिळवला तर तो मालमत्तेचा ‘सहमालक’ बनतो, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

दक्षिण मुंबईतील जुन्या मालमत्तेशी संबंधित एका प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला. दक्षिण मुंबईतील एका जुन्या मालमत्तेत एक व्यकती अनेक वर्षे भाडेकरू म्हणून राहत होती. काही काळानंतर भाडेकरूने मालमत्तेच्या मूळ मालकांपैकी एकाकडून घराचा काही हिस्सा विकत घेतला. मात्र इतर सहमालकांनी त्या व्यक्तीला भाडेकरू ठरवून निष्कासित करण्यासाठी कायदेशीर लढाई सुरु केली होती. या प्रकरणावर न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणात तीन भाडेकरूंनी दाखल केलेला अर्ज मंजूर केला.

उच्च न्यायालयाने भाडेकरूंना निष्कासित करण्याचे आदेश देणारा अपिलीय न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवला. एकदा भाडेकरूने मालमत्तेत मालकी हक्क मिळवला की तो भाडेकरू राहत नाही, तो मालमत्तेचा सहमालक बनतो. कायद्यानुसार, संबंधित भाडेकरुला कोणताही मालक आपल्या मालमत्तेतून बेदखल करु शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Comments are closed.