IPL 2026: हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी मुंबईला भोवली; 2024 पासून पराभवाचा असा आहे रेकॉर्ड
आयपीएल (IPL) 2026 चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एखाद्या भयानक स्वप्नासारखा ठरला आहे. या हंगामात मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 5 सामन्यांत त्यांना पराभवाचा धक्का बसला असून, केवळ 2 सामने त्यांना जिंकता आले आहेत. या सततच्या पराभवामुळे कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik pandya) आता निशाण्यावर आला आहे. खेळाडू आणि कर्णधार अशा दोन्ही आघाड्यांवर हार्दिक फ्लॉप ठरल्याने त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. त्याची खालावलेली कामगिरी पाहता, ‘कर्णधार म्हणून हे त्याचे शेवटचे वर्ष असेल का?’ असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
2024 मध्ये हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले आणि संघात येताच त्याला कर्णधारपद देण्यात आले. मात्र, 2024 पासून आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने हारणारा संघ मुंबई इंडियन्सच आहे. या काळात मुंबईने तब्बल 22 सामने गमावले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स (21 पराभव) आहे. विशेष म्हणजे चेन्नईचा संघ सध्या बदलाच्या स्थितीतून जात आहे, पण मुंबईचे अनुभवी आणि दिग्गज खेळाडू संघात असूनही त्यांना सलग पराभवाचा सामना करावा लागत आहे, ही चिंतेची बाब आहे.
हार्दिक पांड्या केवळ कर्णधार म्हणूनच नाही, तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणूनही अपयशी ठरला आहे. या हंगामात 6 डावांत त्याला केवळ 97 धावा करता आल्या आहेत. गोलंदाजीतही त्याने फक्त 3 विकेट्स घेतल्या असून 12.66 च्या इकॉनॉमी रेटने धावा लुटवल्या आहेत. मैदानातील त्याच्या काही अजब निर्णयांमुळे चाहतेही हैराण झाले आहेत.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने दोन षटकांत 38 धावा दिल्या. फलंदाजीला आल्यावर जेव्हा संघाला मोठ्या खेळीची गरज होती, तेव्हा तो केवळ 2 चेंडूत 1 धाव काढून बाद झाला. या सामन्यात चेन्नईने मुंबईचा 103 धावांनी पराभव केला. धावांच्या फरकाने झालेला हा मुंबई इंडियन्सच्या आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे.
Comments are closed.