संतापजनक! लोकलमध्ये महिलांच्या डब्यात पोलीस शिपायाचं अश्लील वर्तन; दारू पिऊन उद्धटपणा, अरेरावी

मुंबई : मिरा भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपायानेच (Police) लोकलच्या लेडीज डब्यात दारूच्या नशेत महिलांशी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वसई रोड रेल्वे पोलिसांनी संबंधित पोलीस शिपायाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 74 (महिलांच्या मर्यादेचा भंग) आणि कलम 351(2) (धमकी व जबरदस्ती) अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी 2:52 वाजता सुटणाऱ्या बोरीवली-वसई स्लो लोकलमध्ये (Local) घडली. या घटनेनंतर महिलेसह काही प्रवाशांनी रेल्वे (Railway) पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

पोलीस शिपाई अमोल किशोर सपकाळे (पोलीस आयुक्तालय – मिरा भाईंदर, वसई-विरार) हा दारूच्या नशेत, खाकी वर्दीतच मिरा रोड स्थानकातून महिलांच्या डब्यात चढल्याचा आरोप आहे. डब्यातील महिलांनी सांगितले की, सपकाळे हा महिला प्रवाशांच्या पाठीवर हाताच्या कोनीने हात मारत होता, आणि सीटवर बसून काही महिलांना तिकीट विचारण्याचा बनाव करत होता. तसेच महिलांकडे घाणेरड्या नजरेने बघत होता. इतकेच नव्हे तर काही महिलांचे मोबाईल फोन हिसकावून घेतल्याचाही आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकाराला कंटाळून काही महिलांनी नायगाव स्थानकात त्याला जबरदस्ती उतरवले व स्टेशन मास्तरकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर स्टेशन मास्तरने वसई रोड रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी येत अमोल सपकाळेला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.

महिला प्रवासी अभया अक्षय वेरणेकर यांनी वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करत आरोपी शिपायाला अटक केली. आरोपीने दारूच्या नशेत महिलांवर अश्लील वर्तनामुळे महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वेतील महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, “जर वर्दीतील पोलीसच असे वागत असतील, तर मग सुरक्षा कुणाच्या हवाली?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.

तिकीट तपासणीवर वाद, प्रवाशाकडून तोडफोड

मुंबईच्या विरार लोकल रेल्वेत पुन्हा एकदा तिकीट तपासणीवरून वाद निर्माण झाला आहे. विरार फास्ट लोकलमध्ये तिकीट नसलेल्या प्रवाशाने चक्क तिकीट तपासणाऱ्या अधिकाऱ्यांशी वाद घालत तिकीट तपासणी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला मारहाण करत तोडफोड केली. दादर ते बोरीवली दरम्यान पहिल्या वर्गाच्या डब्यात तिघे प्रवासी दुसऱ्या वर्गाचे तिकीट घेऊन प्रवास करत होते. त्यापैकी एकाकडे अंधेरी ते बोरीवलीदरम्यान तिकीटही नव्हते. तपासणीकर्ता उपमुख्य तिकीट तपासनीस शमशेर इब्राहिम यांनी ही बाब लक्षात आल्यावर तिघांनाही बोरीवली स्थानकावर उतरवले. मात्र, पुढील कार्यवाहीसाठी TTE/TC कार्यालयात नेल्यावर एका प्रवाशाचा संताप अनावर झाला. तिकीट तपासणीवरून झालेल्या वादातून त्याने कार्यालयातील संगणक CPU व इतर साहित्याची तोडफोड केली. वाद इतका वाढला की, त्यात प्रवासी आणि एक रेल्वे कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा

Video : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? मंत्री संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

आणखी वाचा

Comments are closed.