मतदार यादीतून नाव गायब का केले?; नागरिकांचा संतप्त सवाल
एसआयआरच्या प्रक्रियेत ज्यांना मतदार यादीतील नावासंबंधी अडचणी निर्माण झाल्या असे अनेक नागरिक मोर्चात सहभागी झाले. आज मी 17 वर्षांचा आहे. मी मतदान करत नाही. पण भविष्यात मतदार यादीतून कुणाचे नाव गायब होऊ नये, हा विचार घेऊन मोर्चात सहभागी झाल्याचे दहिसर येथून आलेल्या मुलाने सांगितले. ‘मतदार यादीतले नाव काढले आहे. आमची देशातील ओळख संपत चालली आहे. आम्ही महाराष्ट्रीय आहोत, हिंदुस्थानी आहोत की बांगलादेशी आहोत, याचे उत्तर ज्ञानेश कुमारांनी द्यावे’, अशी प्रतिक्रिया तरुणाने दिली. बडय़ा व्यक्तींच्या नावांमध्ये अडचणी येत असतील, तर आमच्यासारख्या वंचितांचे काय होईल. मी विरोध दर्शवण्यासाठी आलो आहे, असे मत कृष्णन नावाच्या मुलाने मांडले.
‘आमचे मत अनमोल आहे, ते चोरीला जाऊ नये, लोकशाही वाचावी म्हणून आज आम्ही मोर्चात आलोय,’ अशा भावना अनेक तरुणांनी व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातही घोषणा दिल्या जात होत्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधानाची प्रतिमा असलेले फलक उंचावण्यात येत होते.
‘ठाकरेंचा मोर्चा, देशभर चर्चा’ असे टीशर्ट घालून अनेक जण गटागटाने मोर्चात उतरले होते. ‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, ज्ञानेश कुमार राजीनामा द्या,’ वोट चोर कहाँ मिलेंगे बीजेपी के दप्तर मे,’ असे म्हणत वोटचोरीविरोधातील संताप मोर्चात दिसून आला.
Comments are closed.