एसआयआर रद्द करा! सत्तेवर कोणाला बसवायचे हे जनता ठरवेल, निवडणूक आयोग ते ठरवू शकत नाही; राज ठाकरे यांचा हल्ला
‘संपूर्ण देशात सरसकट सुरू असलेला एसआयआर पूर्णपणे बेकायदा आहे. महाराष्ट्रासह देशभरातील ही एसआयआर प्रक्रिया रद्द झाली पाहिजे आणि यापुढच्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत. सर्व राजकीय पक्षांनी दिल्लीत यासाठी आवाज उठवावा. या दोन गोष्टी झाल्या तर ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल,’ अशी खणखणीत भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मांडली.
शिवसेना-मनसेच्या ‘गर्जना’ मोर्चाला संबोधित करताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपच्या हुकूमशाही कारभारावर जोरदार हल्ला चढवला. ‘आपण या देशाचा ढाचा बदलतो आहोत, उद्ध्वस्त करतो आहेत याचे भानही सत्ताधाऱ्यांना राहिलेले नाही. येणाऱ्या पिढय़ांनी या देशात कसे जगायचे, कसे राहायचे, असा सवाल त्यांनी केला. कोणत्याही पद्धतीने सत्तेत यायचे आणि लोकांवरती वरवंटा फिरवायचा हेच सरकारकडून सुरू आहे. त्याविरोधात हा मोर्चा आहे,’ असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
देशातील मतचोरी व निवडणूक घोटाळ्यांवर त्यांनी आकडेवारीसह प्रकाश टाकला. या घोटाळ्यांमुळे वातावरण तापल्याचेही ते म्हणाले. ‘देशात मतांच्या चोऱ्या सुरू आहेत. निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि मतदार याद्यांमध्ये घोळ सुरू आहेत हे मी 2017-2018 पासून सांगत होतो. घोटाळ्याशिवाय अशा प्रकारे मतं कमी होऊच शकत नाहीत आणि भाजपची वाढू शकत नाहीत असे माझे म्हणणे होते. त्यावेळी मी सोनिया गांधी, ममता बॅनर्जींसह अनेक नेत्यांना भेटलो होतो. आपण याबाबत पाऊल उचलले पाहिजे. निवडणुकीवर बहिष्कार टाकला पाहिजे. त्याशिवाय ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार नाही, असे त्यांना सांगितल्याची आठवण राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला दिली.
असा कुठला वायग्रा आहे? दणादण मतदार वाढतात!
मतचोरीबद्दल सविस्तर बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ दिला. ‘2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत जवळपास 40 ते 60 लाख मतदार वाढवले गेले. अचानक एवढे मतदार वाढतात कसे? असा कुठला वायग्रा आहे की दणादण मतदार वाढतात. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला 2 कोटी 44 लाख 27 हजार मते मिळाली होती. पुढे सहा महिन्यांनंतर ज्या निवडणुका झाल्या, त्यात भाजपला 3 कोटी 16 लाख 16 हजार मते पडली. 1 कोटी मते वाढली? हे कसे झाले ते सगळे आता उघडच झाले आहे, असे राज ठाकरे म्हणाले. ‘त्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे वगैरे लोकांना संपूर्ण बहुमत मिळूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता. कुठेही जल्लोष नव्हता. विजय मिळवल्यानंतर देखील लोकांमध्ये उत्साह नाही, जल्लोष नाही. असा कोणता विजय असतो,’ असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
‘कोणताही विरोधी पक्ष सत्तेवर असला तर त्याच्या मनात एक धाकधूक असते, भीती असते. भाजपला अशी कोणतीही भीती वाटत नाही. मनमानी कारभार सुरू आहे. एकाच उद्योगपतीला जमिनी द्यायच्या, विमानतळं देऊन टाकायची, पोर्ट देऊन टाकायचे. आम्ही काहीही केले तरी फरक पडत नाही ही गोष्ट येथे कोठून? निवडणूक आयोगाला बांधल्याशिवाय हे होऊ शकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. ‘तुम्ही कितीही मोर्चे काढा, आंदोलने करा. निवडणूक आयोग आमच्यासोबत असेल तर आम्ही कसेही वागू. देशाला अर्थिकदृष्टय़ा बरबाद करू. अमेरिकेला शरण जाऊ, पेट्रोलचे, अन्नधान्याचे भाव वाढवू, लोकांना रांगेत उभे करू असे सगळे सुरू आहे, असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
सुप्रीम कोर्ट, हायकोर्टही ताब्यात घेऊन ठेवलीत
मोदी सरकारने सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टही ताब्यात घेतल्याचा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. ‘देशाला उद्योगपती हवे आहेत. काँग्रेसच्या काळातही उद्योगपती उभे राहिले. पण ते ‘अनेक’ होते. भाजपच्या काळात फक्त एक उद्योगपती मोठा होताना दिसतो. ही हिंमत आली कुठून? याचे कारण यांनी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट ताब्यात घेतलेत. सगळी चॅनल्स, निवडणूक आयोग ताब्यात घेऊन ठेवलाय. जनतेपर्यंत खऱ्या बातम्या पोहोचूच दिल्या जात नाहीत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
दुसरा पक्ष सत्तेवर येईल, तेव्हा कुठे जाल?
आपण उचललेले चुकीचे पाऊल, चुकीचे घेतलेले धोरण हा भविष्यात पायंडा पडून जाणार नाही ना, याचा विचार सत्तेतील पक्षाने करायला हवा. कारण सत्ता ज्या दिवशी येते, त्याच क्षणी सत्ता जायला सुरुवात होते. तुम्ही तो काळ किती पुढे ढकलता, एवढाच विषय असतो. आज भाजप सत्तेवर आहे, उद्या सत्तेवर नसेल. उद्या दुसरा कोणतातरी पक्ष सत्तेवर आला आणि त्या पक्षाने अशाच प्रकारे सत्ता राबवायचे ठरवले तर तुम्ही काय कराल? तुमच्यापेक्षा दामदुपटीने अशाच गोष्टी केल्या, तर कुठे जाल?, असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपला केला.
संपूर्ण देशभर सरसकट एसआयआर कशासाठी?
माजी केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंग यांच्या वक्तव्याचा दाखला देत राज ठाकरे यांनी एसआयआरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘संपूर्ण देशभर एसआयआर राबवण्याची कायद्यातच तरतूद नाही. पूर, भूपंपासारखी एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आली. मोठय़ा प्रमाणावर माणसे स्थलांतरित झाली किंवा खूप डुप्लिकेट नावे आहेत अशा तक्रारी आल्या तरच एसआयआर केले जाऊ शकते. तसे काहीही नसताना सरसकट एसआयआर कशासाठी केले गेले? हा एसआयआर बेकायदेशीर आहे, असे राज ठाकरे म्हणाले. विधानसभेला 40 ते 60 लाख मतदार वाढवले आणि आता एसआयआरमधून दोन कोटी काढले. बोगस मतदार वाढवायचे, वाटेल तशा मतदार याद्या करायच्या आणि त्यातून सत्ता मिळवायची हे किती काळ चालणार? असा सवालही त्यांनी केला.
सत्ताधारी पक्षाला मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. आम्हाला तुमच्याबद्दल असुया वाटत नाही. तुम्ही सत्तेवर आहात म्हणून तुमच्यावर राग नाही. पण तुम्ही शक्ती कशी राबवताय आणि कशातून राबवताय याचा राग आहे.
Comments are closed.