दिल्लीत आंदोलक आक्रमक, पोलिसांकडून महिला पत्रकारांचा विनयभंग झाल्याच्या आरोपाने खळबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात वणवा पेटला असून दिल्लीतही आंदोलक आक्रमक झाले आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी जंतर मंतरकडे पूच करणाऱ्या आंदोलकांची धरपकड करण्यात आली. ‘आयसा’च्या अध्यक्ष नेहा बोरा यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी तीन महिला पत्रकारांचा विनयभंग केल्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. पीडित पत्रकारांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी 2 ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना जंतर मंतरवर जाण्यापासून रोखले जात आहे. आंदोलक त्यासाठी प्रयत्न करत असल्याने तणाव निर्माण झाला आहे. शनिवारी आंदोलकांनी पुन्हा जंतर मंतरवर जाण्याचा प्रयत्न केला. ‘डिजिटल न्यूज पोर्टल’च्या महिला पत्रकार या घडामोडीचे वार्तांकन करत होत्या. आंदोलकांमध्ये मोठय़ा संख्येने तरुणी असतानाही तिथे महिला पोलीस कर्मचारी नव्हत्या. याविषयी महिला पत्रकाराने पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारला असता त्याने तिच्यासोबत गैरवर्तन करत धक्काबुक्की केली. तर, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव आणि वकील प्रशांत भूषण यांना ताब्यात घेतानाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराचा एका पुरुष पोलिसाने विनयभंग केला, अश्लील चाळे केले. आणखी एका महिला पत्रकाराला असाच अनुभव आला. या घटनेनंतर पत्रकार व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरनी संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलन केले. तसेच दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून चौकशी सुरू केली आहे.

काँग्रेसचा कँडल मार्च

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उदय भानू चिब यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कँडल मार्च काढला. पोलिसांनी त्यांनाही अटकाव केला. जंतर मंतरवर आंदोलनास मज्जाव करण्यात आल्यामुळे काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने दिल्ली पोलिसांच्या या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनांना पोलीस मनाई करू शकत नाहीत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

Comments are closed.